Sunday, 25 May 2025

कोकणात ओला दुष्काळ जाहीर करा- स्वतंत्र कोकण राज्य अभियानचे संस्थापक /अध्यक्ष श्री.संजय कोकरे

कोकणात ओला दुष्काळ जाहीर करा- स्वतंत्र कोकण राज्य अभियानचे संस्थापक /अध्यक्ष श्री.संजय कोकरे

मुंबई (शांताराम गुडेकर)
     यंदा कोकणात न भूतो न भविष्यति असा पाऊस मे महिन्यात पडतोय. अवकाळी पाऊस (ज्याला आम्ही 'धडकवनी' म्हणतो) पडतो, पण एवढा नाही. तास दोन तास पडून मोकळा व्हायचा. यावर्षी १५ मे पासूनच तो रोज हजेरी लावू लागला आणि १९ पासून तर जुलै महिन्यात पडतो तसा मुसळधार हंगामी पाऊस पडतोय. यंदा आंबा हंगाम चांगला होता.विक्री जोमाने सुरू होती. शेतकऱ्यांना चांगला दर मिळत होता. अजून झाडावर आंबा काढायचा आहे, तो तसाच राहिला. या पावसामुळे विक्री योग्य आंब्याचा दर पडला.
           पावसाच्या पुर्वीचा नारळाचा पाडा अर्धवट राहिला. करवंद, अळुची उसरी, फणसाचे गरे, आंब्या फणसाची साठं यांचं वाळवण सुकवण भिजून गेले. हे पदार्थ देखील आमच्या तुटपुंज्या अर्थ व्यवस्थेचा भाग आहे.
           आमच्या आगोटी कामात लाकूड फाटा भरणे, गुरांसाठी वैरण भरून ठेवणे, अशी किरकोळ वाटणारी कामेही जरुरीची असतात. कारण फाटी आणि वैरण भिजली, तर होणारे हाल शेतकऱ्यालाच माहीत.
        मेहनतीने केलेल्या भाजावणीवर धुळ पेरणी करणे तर दूरच पण आता भिजून गार झालेल्या शेतात बी रुजून तरी येईल का आणि पाऊस पेरणी करायला उसंत तरी देईल का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 
        अशा वेळी सरकारने कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. वर उल्लेखिलेल्या काही बाबी सरकारच्या लेखी किरकोळ असल्या तरी आमच्या संसारोपयोगी आहेत. त्यांची मोजदाद सरकारी व्यवस्थेत बसत नाही. म्हणून नेहमी प्रमाणे आम्ही कोकणवासी शासनाच्या दुष्काळाच्या चौकटीत बसणार नाही. आता कसोटी आहे, आमच्या लोक प्रतिनिधींची...! ते कशाप्रकारे आमची समस्या शासन दरबारी मांडतात आणि कोकणात ओला दुष्काळ जाहीर करतात, इकडे आमचे डोळे लागले आहेत. तरी एकंदरीत विचार करता शासनाने कोकणात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी स्वतंत्र कोकण राज्य अभियानचे संस्थापक /अध्यक्ष श्री.संजय कोकरे करत आहेत.

No comments:

Post a Comment

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर झाल्याबद्दल आभार सभा संपन्न !!

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंज...