आर. के. एफ. जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय शेवा येथे शिवजयंती उत्सवाचा अभूतपूर्व सोहळा; !!
** जेएनपीटी टाऊनशिपमध्ये शिवरायांच्या नामाचा जयघोष!
उरण दि २०, (विठ्ठल ममताबादे) : आर. के. एफ. जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय, शेवा येथे गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी 'शिवजयंती उत्सव' अत्यंत जल्लोषात आणि पारंपारिक उत्साहात संपन्न झाला. या दिमाखदार सोहळ्याने संपूर्ण जेएनपीटी टाऊनशिप परिसर भगवामय झाला असून शिवरायांच्या जयघोषाने भारावून गेला होता. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पालक-शिक्षक संघाचे प्राथमिक मराठी माध्यम विभागाच्या उपाध्यक्षा अश्विनी पाटील, प्राथमिक इंग्रजी माध्यमाचे उपाध्यक्ष ॲड. केवल गावंड, माध्यमिक इंग्रजी माध्यमाचे उपाध्यक्ष अविनाश म्हात्रे, तसेच विश्वास पाटील, पालक संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष योगेश तांडेल, उपाध्यक्ष रमाकांत म्हात्रे, आणि जासईचे गुरुनाथ म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे माध्यमिक विभागाच्या विद्यार्थिनींचे लेझीम पथक होते. क्रीडा शिक्षक मनोहर टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक मराठमोळ्या वेशभूषेत या मुलींनी लेझीमचा ताल धरला. शिवरायांच्या पालखी सोहळ्याने संपूर्ण जेएनपीटी टाऊनशिपमध्ये मिरवणूक काढली. इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी शिवराय, जिजाऊ आऊसाहेब आणि मावळ्यांच्या वेशभूषेत सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.मिरवणूक सेक्टर १ मधील प्राथमिक विभागाच्या शाळेत पोहोचल्यानंतर, बालोद्यान, प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन किशोर म्हात्रे आणि मिलिंद ठाकूर यांनी संयुक्तपणे केले. यावेळी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शिक्षक विनोद हरड आणि वर्षा म्हात्रे तसेच चौथी मधील विद्यार्थी नमित वाघावले यांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. विशेष कौतुकाची बाब म्हणजे, इयत्ता चौथीमधील विद्यार्थिनी प्रत्यूषा हिने आपल्या ओघवत्या आणि प्रभावी वक्तृत्वाने उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या या भाषणाचे सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या तिन्ही विभागांच्या मुख्याध्यापकांचे म्हणजे रमाकांत गावंड (प्राथमिक), गिरीश पाटील (माध्यमिक), अंकुश जोगळे, भूषण जाधव, आणि मुख्याध्यापिका वैशाली बोरचटे (बालोद्यान) यांचे नियोजन कौतुकास्पद ठरले. तसेच ज्येष्ठ शिक्षक जगदीश मढवी आणि सुपरवायझर चंदा टेमकर यांचेही सहकार्य लाभले. विशेष म्हणजे, हा सोहळा यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महिला सफाई कामगार आणि सिक्युरिटी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच तमाम पालक वर्गाचे मोलाचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांचे चॉकलेट देऊन तोंड गोड करण्यात आले. या भव्य कार्यक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे आभार मुख्याध्यापक रमाकांत गावंड यांनी मानले. अशा पद्धतीने हा भारदस्त आणि प्रेरणादायी सोहळा संपन्न झाला
No comments:
Post a Comment