रासपचे युवा नेते अजित पाटील राज्यस्तरीय आदर्श रत्न पुरस्काराने सन्मानित !!
*जत / प्रतिनिधी :*
जत येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्याचे युवक प्रदेशाध्यक्ष अजित पाटील यांना "राज्यस्तरीय आदर्श रत्न पुरस्कार - २०२६" ने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे 'राष्ट्रभक्ती परिवार' आणि 'शौर्य करिअर अकॅडमी' पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र दिनानिमित्त हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
अजित पाटील हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून राज्याचे युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थी दशेपासून गेल्या अनेक वर्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ते राष्ट्रीय समाज पक्षामध्ये वेगवेगळ्या पदावरती काम करत आले आहेत. एक आक्रमक अभ्यासू व्यक्तिमत्व भाषणावरती प्रभुत्व असणारे युवकांचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राज्यभर युवकांचे संघटन जाळे त्यांच्या माध्यमातून निर्माण केले जात आहे. राज्यभर दौरा करत युवकांच्या प्रश्नांवरती भूमिका घेणे अशा या नेतृत्वास क्रियाशील युवा नेतृत्व म्हणून त्यांच्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अध्यक्षस्थानी एमआयटी संस्थेचे संचालक महेश थोरवे होते. अध्यक्ष भाषणात ते म्हणाले, आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात तरुणांनी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर पुढे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. कष्टाला कोणताही पर्याय नसून, सातत्यपूर्ण प्रयत्नातूनच व्यक्तिमत्व घडते आणि सक्षम राष्ट्रनिर्मितीला बळ मिळते. समाजासाठी कार्य करणाऱ्या तरुणांचा सन्मान होणे ही प्रेरणादायी बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज कॉलेज ग्रुपचे चेअरमन गोपाल खंडारे उपस्थित होते. पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी तरुणांना देशसेवा व समाजकार्यात पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
सत्काराला उत्तर देताना अजित पाटील म्हणाले, हा सन्मान केवळ माझा नसून, राष्ट्रीय समाज पक्षातील त्या सर्व युवा रत्नांचा आणि माझ्या सहकाऱ्यांचा आहे, ज्यांच्या खंबीर साथीमुळे मला राज्यभर कार्य करण्याची संधी मिळाली. हा पुरस्कार मी माझ्या सर्व युवक सहकाऱ्यांना समर्पित करतो आणि त्यांच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणून हा सन्मान मी स्वीकारला. संयोजकांनी दाखवलेले प्रेम आणि विश्वास मला जनसेवेच्या कार्यात अधिक ऊर्जा देईल.
यावेळी आनंदकुमार दुबे, सौ. भारती तुपे, हरिदास भिसे, सुनील गोरे, राजेंद्र पवार यांच्यासहित अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment