उरणकरांना अतिरिक्त पाणी कपातीपासून मिळाला दिलासा !!
** पाणी नियोजनासाठी एमआयडीसी चाचपणी
उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) :
महाराष्ट्र राज्यात सर्वत्र पाणीकपातीचे सत्र सुरू झाले असताना उरणकरांना मात्र अतिरिक्त पाणी कपातीपासून दिलासा मिळाला आहे. उरण तालुक्यातील रानसई धरणातून केला जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात आधीपासूनच दोन दिवसांची कपात होत आहे. पाणीसाठ्याचे योग्य नियोजन केल्याने यंदा टंचाई काळात अतिरिक्त कपातीपासून उरणकरांचा बचाव झाला आहे. सध्याच्या पाणीसाठ्याबाबत एमआयडीसी चाचपणी करत आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) च्या रानसई धरणातून उरण शहर आणि येथील २३ ग्रामपंचायतीना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात नोव्हेंबर पासूनच कपात केली आहे. आठवड्यातील मंगळवार आणि शुक्रवारी ही कपात केली जाते. उरणच्या रानसई धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी असल्याने पावसाळ्यातील कालावधीत लाखो लीटर पाणी वाया जाते. त्यामुळे येथील नागरिकांना नोव्हेंबर पासूनच पाणीकपातीचा सामना करावा लागतो.उरणकरांना दररोज ४१ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना एमआयडीसीकडे केवळ ३० दश लक्ष लिटर पाणी असल्याने तूट भरून काढण्यासाठी कपात केली जाते.तसेच दुसरी महत्वाची समस्या म्हणजे धरण क्षमता वाढवण्याचा प्रस्ताव धूळखात पडला आहे.धरणाची पाणी क्षमता वाढविण्यासाठी एमआयडीसीने तयार केलेला प्रस्ताव अनेकवर्षे धूळखात पडला आहे. ही समस्या निकाली लागल्यास उरणच्या नागरिकांना मुबलक व मोठया प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होईल.
कोट (चौकट ):-
उरण तालुक्यातील रानसई धरणातील पाणीसाठ्याच्या वापराचे नियोजन नोव्हेंबरपासून सुरू आहे. सध्याच्या पाणीसाठ्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती घेण्यात येत आहे. तसेच जास्तीत जास्त पाणी बचतीकडे लक्ष दिले जात आहे. - जी. एन. सोनवणे, उपअभियंता, एमआयडीसी, उरण.
No comments:
Post a Comment