Wednesday, 8 July 2026

शास्त्रीनगर रुग्णालयाला आमदार रोहित पवार यांची भेट; डॉक्टरांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध !!

शास्त्रीनगर रुग्णालयाला आमदार रोहित पवार यांची भेट; डॉक्टरांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध !!

डोंबिवली, संदीप शेंडगे :
             डोंबिवली येथील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेची दखल घेत आमदार रोहित पवार यांनी बुधवारी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी जखमी डॉक्टर, नर्स तसेच रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करून संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

रुग्णालय भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. डॉक्टर आणि नर्स यांच्यावर हात उचलणाऱ्यांविरुद्ध कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. रुग्णसेवा करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला होणे अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह असल्याचे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावरही जोरदार टीका केली. "डॉक्टर आणि नर्स यांना मारहाण करणाऱ्यांची अंडरवेअर आणि बनियनवर धिंड काढली पाहिजे," अशी कठोर शब्दात तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे राजकीय संरक्षण मिळता कामा नये, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
तसेच त्यांनी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना फोन लावून संबंधित नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर चार आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

दरम्यान, शास्त्रीनगर रुग्णालयातील मारहाणीच्या घटनेमुळे राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात संतापाचे वातावरण असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध डॉक्टर संघटना, वैद्यकीय कर्मचारी आणि नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि पुढील कारवाई काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ता. क. - आताच मिळालेल्या माहितीनुसार सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

*" पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा "*

*" पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा "* महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ८ ज...