डंपिंग ग्राउंडमधील सडलेल्या भाज्या पुन्हा बाजारात?
नगरसेवक रोहिदास वाघमारे यांचा गंभीर आरोप; चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
भिवंडी, प्रतिनिधी :
दिनांक 07 जुलै 2026
भिवंडी शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. एका ऑनलाइन विक्री केंद्रातून टाकाऊ म्हणून फेकण्यात आलेल्या सडलेल्या व खराब भाज्या डंपिंग ग्राउंडमधून पुन्हा गोळा करून शहरातील झोपडपट्ट्या आणि गरीब वस्त्यांमध्ये विकल्या जात असल्याचा आरोप भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नगरसेवक रोहिदास वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
नगरसेवक रोहिदास वाघमारे यांनी सांगितले की, शहराबाहेरील एका ऑनलाइन विक्री केंद्रातून मोठ्या प्रमाणात खराब व सडलेल्या भाज्या डंपिंग ग्राउंडवर टाकल्या जात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी जाऊन दोन डंपर अडवून त्यांची पाहणी केली. चौकशीत संबंधित डंपरमधील भाज्या ऑनलाइन विक्री केंद्रातून नष्ट करण्यासाठी आणण्यात आल्याचे समोर आले.
वाघमारे यांनी आरोप केला की, डंपिंग ग्राउंडवरील कचरा वेचणारे काही लोक या सडलेल्या भाज्या वेगळ्या करून रात्रीच्या वेळी शहरातील झोपडपट्ट्या व गरीब वस्त्यांमध्ये अत्यल्प दरात विकतात. या भाज्या नागरिकांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचत असल्यास हजारो लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. अशा भाज्यांचे सेवन केल्यास अन्न विषबाधा, संसर्ग आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणात नगरसेवक वाघमारे यांनी महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. कथित संगनमत आणि अवैध वसुलीमुळे हा प्रकार दीर्घकाळ सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यभर अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळयुक्त व निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात मोहीम राबविण्यात येत असताना भिवंडीत अशा प्रकारे सडलेल्या भाज्यांची विक्री होत असल्याचा आरोप अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात कोणत्याही अधिकाऱ्याचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हावी, अशी त्यांनी मागणी केली.
दरम्यान, या आरोपांमुळे भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांनी खराब अन्नपदार्थांच्या विल्हेवाटीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून टाकाऊ अन्नपदार्थ पुन्हा बाजारात पोहोचणार नाहीत आणि नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ कायमचा थांबेल.
No comments:
Post a Comment