महापौर हर्षाली चौधरी यांचा अचानक पाहणी दौरा !!
** गटारांवरील अतिक्रमण पाहून संताप
कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी यांनी आपल्या प्रभागातील विविध भागांचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान आंबिवली येथील अटाळी आणि इराणी वस्ती परिसरात अनेक ठिकाणी उघड्या गटारांवर फळविक्रेते, चायनीज फूड स्टॉल तसेच इतर व्यावसायिकांनी थेट गाड्या लावून व्यवसाय सुरू केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
ही परिस्थिती पाहताच महापौर चौधरी यांनी तातडीने वाहनांचा ताफा थांबवत संबंधित विक्रेत्यांना फैलावर घेतले. गटारांवर अतिक्रमण करून व्यवसाय करणे हे नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असून यामुळे स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी फळविक्रेते, चायनीज गाड्या तसेच इतर व्यावसायिकांना "गटारांवर कोणत्याही प्रकारच्या गाड्या लावू नयेत, तसेच गटारांवर कोणत्याही वस्तू ठेवू नयेत. अन्यथा महानगरपालिकेकडून कठोर कारवाई करण्यात येईल," असा स्पष्ट इशारा दिला.
महापौरांच्या या अचानक पाहणीमुळे परिसरातील अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनाही परिसर स्वच्छ व अतिक्रमणमुक्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि गटारांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी महानगरपालिका सातत्याने मोहीम राबविणार असल्याचेही यावेळी महापौरांनी सांगितले.
No comments:
Post a Comment