Tuesday, 7 July 2026

मुसळधार पावसाचा वीजपुरवठ्यावर मोठा परिणाम; जलमय भागांतील वीज सुरक्षेच्या कारणास्तव बंद !!

मुसळधार पावसाचा वीजपुरवठ्यावर मोठा परिणाम; जलमय भागांतील वीज सुरक्षेच्या कारणास्तव बंद !!

टोरेंट पॉवरचे नागरिकांना संयम व सहकार्याचे आवाहन; पाणी ओसरेपर्यंत अनेक भागांत वीजपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता कमी
 
प्रतिनिधी, भिवंडी
मंगळवार, दिनांक ०७ जुलै २०२६ :

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जलभराव झाला असून त्याचा थेट परिणाम वीजपुरवठ्यावर झाला आहे. अनेक ठिकाणी वीज वितरण यंत्रणा पाण्याखाली गेल्याने तसेच विद्युत अपघात टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित भागांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती टोरेंट पॉवरने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

टोरेंट पॉवरच्या माहितीनुसार, सततच्या पावसामुळे वीज खांब, वीजवाहिन्या आणि इतर वितरण यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज सकाळी झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि मोठ्या फांद्या वीजवाहिन्यांवर कोसळल्याने तांत्रिक बिघाड निर्माण झाले असून दुरुस्तीचे काम अधिक आव्हानात्मक झाले आहे.

सध्या शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलेले असल्याने वीजपुरवठा सुरू करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे जनसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पाणी ओसरेपर्यंत काही भागांतील वीजपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. विद्युत अपघात टाळण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचेही टोरेंट पॉवरने नमूद केले आहे.

सध्या इंडियन कॉर्पोरेशन, अरिहंत कंपाऊंड, महावीर कॉम्प्लेक्स, पारसनाथ कंपाऊंड, पद्ममनी कंपाऊंड, तनोनी नाका, अमीना कंपाऊंड, समीर कंपाऊंड, सुभाष नगर, शिवाजी चौक सिव्हेज पंप परिसर, रहमतपुरा, गायत्री नगर, नुरी नगर, आमपाडा, टेमघर, नागाव, आमणे, शेलार, अंगाव पाडा, निंबावली, खंडपाडा, तनोनी, महापोनी, कवाड, दापोडा गाव, माणकोली परिसर, कृष्णा कॉम्प्लेक्स, खोणी गाव, कांबा गाव, मिल्लत नगर, सावंदे, कांबा, कटई तसेच चाविंद्रा या भागांतील वीजपुरवठा प्रभावित झाला असून, जलभराव आणि व्यापक दुरुस्तीमुळे या भागांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो.

दरम्यान, टोरेंट पॉवरच्या तांत्रिक पथकांकडून युद्धपातळीवर चोवीस तास काम सुरू असून, बिघाड शोधणे, झाडे व इतर अडथळे हटविणे, नुकसानग्रस्त वीजवाहिन्या आणि खांबांची दुरुस्ती करणे तसेच शक्य तितक्या लवकर व सुरक्षितपणे वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

ग्राहकांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल टोरेंट पॉवरने दिलगिरी व्यक्त केली असून, या कठीण परिस्थितीत नागरिकांनी संयम राखून सहकार्य करावे, तसेच पाणी साचलेल्या ठिकाणी वीज उपकरणे, तुटलेल्या वीजवाहिन्या किंवा खांबांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्राहकांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असा पुनरुच्चारही टोरेंट पॉवरने केला आहे.

No comments:

Post a Comment

*" पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा "*

*" पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा "* महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ८ ज...