सावळाराम महाराज क्रीडा संकुलात विकासाच्या नावाखाली शेकडो झाडांची तोड; पर्यावरणप्रेमी संतप्त !!
*डोंबिवली, दि. 19 ऑगस्ट 2026*
डोंबिवली एमआयडीसी मधील वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र या विकासकामासाठी संकुलातील शेकडो लहान-मोठी झाडे तोडण्यात आल्याने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
*पत्रे ठोकून गुप्तपणे झाडतोड*
केडीएमसीने या क्रीडा संकुलाचा सर्वोत्तम आणि आधुनिक दर्जाचे क्रीडा संकुल म्हणून विकास करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि राज्य शासनाकडून मोठा निधी मिळाल्याचे समजते.
सध्या संकुलाच्या मैदानाभोवती अनेक ठिकाणी उंच पत्रे ठोकण्यात आली आहेत. त्यामुळे आत काय चालले आहे हे बाहेरून दिसत नाही. या पत्र्यांच्या आत ठेकेदाराने केडीएमसीच्या संमतीने संकुलातील शेकडो झाडे तोडली असून तोडलेल्या झाडांची तातडीने विल्हेवाटही लावली जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
*वृक्षलागवडीच्या उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह*
एकीकडे केडीएमसी दरवर्षी वृक्षलागवडीसाठी लाखो रुपये खर्च करत असून दीड लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवते. दुसरीकडे स्वतःच्याच मालकीच्या जागेत लावलेली झाडे विकासाच्या नावावर तोडली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. केडीएमसीची वृक्ष संवर्धन समिती सध्या कार्यरत आहे की नाही असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
*पर्यावरणप्रेमींची मागणी*
या झाडतोडीमुळे पर्यावरणप्रेमी संतप्त झाले आहेत. विकासाच्या नावाखाली झाडे तोडणे निंदनीय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या शेकडो झाडतोडीची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करून जर हे कृत्य बेकायदेशीर आढळले तर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
क्रीडाप्रेमींनीही प्रतिक्रिया देताना सांगितले की, जर हे क्रीडा संकुल केवळ खेळाडू आणि विविध खेळांसाठी विकसित केले जात असेल तर भविष्यात ते दहीहंडी, नवरात्र उत्सव, लग्न समारंभ यासारख्या कार्यक्रमांसाठी दिले जाऊ नये.
सध्या प्रशासनाने या प्रकरणी अधिकृत खुलासा केलेला नाही. मात्र झाडतोडीचे प्रमाण आणि त्यामागील परवानगी याबाबत नागरिकांनी पारदर्शक माहिती द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)
No comments:
Post a Comment