Tuesday, 13 October 2026

प्रेमकुंज सोसायटीच्या नोंदणीवर आक्षेप- फसवणूक व बनावट स्वाक्षऱ्यांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी !!

प्रेमकुंज सोसायटीच्या नोंदणीवर आक्षेप- फसवणूक व बनावट स्वाक्षऱ्यांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी !!

*द चालेट्स अव्हेन्यू फेज-II प्रकल्पातील सदनिकाधारकांच्या संमतीचा गैरवापर झाल्याचा तक्रारदाराचा आरोप-  अंबरनाथ पश्चिम पोलिसांकडे एफआयआर दाखल करण्याची मागणी*

अंबरनाथ, अरुण ठोंबरे : बदलापूर पश्चिम येथील द चालेट्स अव्हेन्यू फेज-II या गृहप्रकल्पातील प्रेमकुंज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.च्या नोंदणी प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला असून, कथित फसवणूक, बनावट स्वाक्षऱ्या आणि कागदपत्रांचा गैरवापर झाल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात रितेश वीरेंद्र मिश्रा यांनी विनोद बाबन मिरकुटे आणि सहाय्यक निबंधक राजेंद्र विठ्ठल मरकड यांच्याविरुद्ध अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज सादर केला आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधित गृहप्रकल्पातील काही सदनिकाधारकांच्या स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा कथित गैरवापर करून सोसायटीची नोंदणी करण्यात आली. काही सदनिकाधारकांनी दिलेल्या पत्रात दबाव, धमकी किंवा दिशाभूल करून स्वाक्षऱ्या व कागदपत्रे घेतल्याचा तसेच त्यांचा गैरवापर झाल्याचा दावा केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या आरोपांची स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या स्थापनेला विरोध करणारे अपील क्रमांक ७५-२०२५ विभागीय सहनिबंधक, कोकण भवन यांच्याकडे दाखल करण्यात आले होते. हे अपील प्रलंबित असताना १७ डिसेंबर २०२५ रोजी सुनावणीसंदर्भातील पत्र सहाय्यक निबंधक कार्यालयाला देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर ०७ जनवरी २०२६ मध्ये 'प्रेमकुंज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.' चे नोंदणी प्रमाणपत्र जारी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर नोंदणीसाठी सादर करण्यात आलेल्या मूळ कागदपत्रांची तपासणी, सदनिकाधारकांच्या स्वाक्षऱ्यांची हस्ताक्षरतज्ज्ञांमार्फत पडताळणी, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविणे आणि सदनिकाधारकांची स्वतंत्र संमती तपासणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच आवश्यकतेनुसार डिजिटल संदेश, ई-मेल आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासात घेण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

*दोषींवर कारवाईची मागणी*

प्रकरणात दखलपात्र गुन्हा निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध एफआयआर दाखल करून कायद्यानुसार कारवाई करावी, तसेच तक्रारीची अधिकृत पोच आणि तपासाची सद्यस्थिती लेखी स्वरूपात कळवावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

दरम्यान, तक्रारीतील आरोपांची पोलिसांकडून स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्तींची बाजू आणि पोलिसांच्या तपासातून समोर येणारे निष्कर्ष उपलब्ध नसल्याने आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. या प्रकरणात अंबरनाथ पश्चिम पोलिसांकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

खरांगण येथील वयोवृद्ध महिला शेतकऱ्याच्या तक्रारीत सत्यता; कृषी विभागाची मोहर, जलसंधारण विभागाची पाहणी !!

खरांगण येथील वयोवृद्ध महिला शेतकऱ्याच्या तक्रारीत सत्यता; कृषी विभागाची मोहर, जलसंधारण विभागाची पाहणी !! *कल्याण (संजय कांबळे) :...