Sunday, 18 October 2026

*मैत्री माणुसकी प्रतिष्ठान आणि उत्तम क्लिनिकचे पहिले मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी‌ !

*मैत्री माणुसकी प्रतिष्ठान आणि उत्तम क्लिनिकचे पहिले मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी*

घाटकोपर येथे ६० जणांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ; २५ महिलांची संपूर्ण रक्त तपासणी मोफत

मुंबई प्रतिनिधी (निलेश कोलमकर) : मैत्री माणुसकी प्रतिष्ठान, मुंबई आणि उत्तम क्लिनिक (डॉ. राहुल कोल्हे) यांच्या संयुक्त विद्यमाने, बोझ नहीं मैं फाउंडेशन यांच्या सहकार्याने नवरात्रोत्सवानिमित्त घाटकोपर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ६० व्यक्तींनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. यामध्ये २५ महिलांची संपूर्ण रक्त तपासणी मोफत करण्यात आली.

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक नागरिक विविध आजारांनी त्रस्त आहेत. मात्र, आर्थिक अडचणींमुळे अनेकांना वेळेवर आरोग्य तपासणी करणे आणि आवश्यक वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल मिळवणे परवडत नाही. विशेषतः महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने नियमित तपासणी आणि आजारांचे वेळीच निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही गरज लक्षात घेऊन नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

विशेष म्हणजे, अवघ्या एका आठवड्याच्या कालावधीत या उपक्रमाचे नियोजन आणि तयारी पूर्ण करून शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा प्रतिष्ठानचा हा पहिलाच उपक्रम असून त्याला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक ठरला.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मैत्री माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश कोकमकर, खजिनदार अनामिका राजेश हळदणकर, सदस्य दीपाली संदीप तांबे व त्यांचे कुटुंबीय, तसेच उत्तम क्लिनिकचे डॉ. राहुल कोल्हे यांनी विशेष मेहनत घेतली.

या शिबिरादरम्यान समाजसेवक सुरेश रेवणकर, श्री स्वामी समर्थ असल्फा मठाचे मठाधीश धैर्यशील शितोळे महाराज आणि अभिनेत्री सायली पाचपुते यांनी उपस्थिती लावून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

शिबिरासाठी श्री डायग्नोस्टिक सेंटरचे अमोल टिकेकर आणि प्रशांत पाटील, लाईफ प्लस फार्माचे सलीम सय्यद, राजेश हळदणकर व परिवार, संतोष पारकर व परिवार आणि वैशाली बनसोडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

याशिवाय प्रतिष्ठानचे पदाधिकारी नंदा गोरेगावकर, प्रकाश गोरेगावकर, सुनील सावंत, चंद्रकांत राणे, चैताली राणे, सुचिता सावंत, स्नेहा पारकर आणि प्रकाश मनतोडे यांचेही महत्त्वपूर्ण योगदान लाभले. तसेच सर्व देणगीदार आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

आरोग्यसेवा ही केवळ उपचारांपुरती मर्यादित न राहता ती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे, या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. भविष्यातही शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि इतर सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्याचा संकल्प मैत्री माणुसकी प्रतिष्ठान, मुंबईने व्यक्त केला आहे.‌ नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आरोग्यसेवेचा जागर करत माणुसकीचा संदेश देणारे हे शिबिर यशस्वी ठरले.

No comments:

Post a Comment

*मैत्री माणुसकी प्रतिष्ठान आणि उत्तम क्लिनिकचे पहिले मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी‌ !

*मैत्री माणुसकी प्रतिष्ठान आणि उत्तम क्लिनिकचे पहिले मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी* घाटकोपर येथे ६० जणांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ; २५ म...