शहापूर तालुका शंभर टक्के दुष्काळाच्या छायेत; कल्याण-मुरबाडमध्ये पिके करपू लागली, बळीराजाला वाली कोण ?
*कल्याण (संजय कांबळे) :* ठाणे-पालघर जिल्ह्यात भातपिकांची लोंबी बाहेर पडत असताना, वरईच्या लोंबीत दाणे भरत असताना, नागली गोंडा-बोंड्यावर असताना तसेच उडीद, खुरासणी, तीळ ही पिके फुलावर असतानाच पावसाने दडी मारल्याने शहापूर तालुका 100 टक्के दुष्काळाच्या छायेत गेला आहे. कल्याण आणि मुरबाड तालुक्यातही पिके करपू लागली असून ही बाब पीक परिस्थिती अहवालातून समोर आली आहे.
असे असताना जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर न झाल्याने बळीराजाला वाली कोण, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. डझनभर लोकप्रतिनिधी गप्प बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्यातील शहापूर तालुक्याचे पर्जन्यमान 2,389.30 मिमी एवढे आहे. सध्या सर्वत्र पावसाने उघडीप दिली आहे. खरीप हंगामात तालुक्यात 17,399.30 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. त्यामध्ये भात 14,732.30 हेक्टर, नागली 425 हेक्टर, वरई 1,533 हेक्टर, उडीद 142.90 हेक्टर आणि तूर 468 हेक्टर अशी पेरणी झाली होती.
मात्र पिकांची अवस्था पाहता हळव्या भाताची लोंबी बाहेर पडली असली तरी पावसाअभावी दाणे भरत नाहीत, तर निमगरवे पीक पोटरीतच करपत आहे. जवळपास 5,598 हेक्टर क्षेत्रात अशी परिस्थिती आहे. नागली हे पीक डोंगर उतारावर असल्याने ते 100 टक्के हातातून गेले आहे. वरई हे माळ-वरकस क्षेत्रावर असल्याने तेही 100 टक्के गेल्यात जमा आहे. उडीद, खुरासणी, तीळ ही पिके फुलावर असतानाच करपत असल्याने त्यांचेही 100 टक्के नुकसान होणार आहे. एकूणच शहापूर तालुका 100 टक्के दुष्काळाच्या छायेत असल्याचे तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव यांनी दिलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यांनी तालुक्यातील अनेक गावांतील शेतीला भेटी दिल्या आहेत.
अशीच परिस्थिती कल्याण आणि मुरबाड तालुक्यातही आहे. पिके लोंबीत आली असताना पावसाने दडी मारल्याने दाणे भरत नाहीत, उलट पिके करपू लागली आहेत. गोवेली-ठाकूरपाडा येथील कै. गणपत लुखा हिंदोळे यांच्या शेतातील पिके पाहून डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती आहे.
असे असूनही राज्यातील 265 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले असताना ठाणे जिल्ह्यातील एकही तालुका जाहीर झाला नाही. हे अपयश डझनभर लोकप्रतिनिधींचे की गुलाम झालेल्या जनतेचे, याचा विचार प्रत्येकाने करावा. एक मात्र नक्की की जिल्ह्यात शेतकऱ्यांना कोणी वाली उरला नाही, अशी भावना व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment