*डोंबिवली, प्रतिनिधी :* एमआयडीसी निवासी परिसरात नव्याने बनविलेले काँक्रीट रस्ते तोडण्याचे काम पावसाळ्यानंतर पुन्हा सुरू झाले आहे.
मिलापनगरमधील रस्ता क्रमांक दोनवरील बंगला भूखंड आरएल १२७ समोर मोठ्या नाल्याच्या बांधकामासाठी काँक्रीटचा आडवा रस्ता तोडण्यात आला आहे. त्यामुळे तेथील वाहतूक पूर्णपणे बंद असून, पादचाऱ्यांनाही जाता येत नसल्याने मोठा वळसा घालून जावे लागत आहे. पुढील महिनाभर वाहनधारक आणि पादचाऱ्यांना हा त्रास सहन करावा लागणार आहे. रस्ता तोडताना होणाऱ्या आवाज आणि धुळीमुळे प्रदूषणात भर पडली असून, जवळच राहणाऱ्या ९४ आणि ९० वर्षीय वयोवृद्ध दाम्पत्यासह परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
एमआयडीसीतील अनेक नवीन रस्ते यापूर्वीही नवीन नाले, गटारे, सांडपाणी, विद्युत आणि पाणी वाहिन्यांसारख्या विविध कारणांसाठी तोडण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षांत अंदाजे २१ रस्ते अशा प्रकारे तोडण्यात आल्याने शासनाच्या म्हणजेच जनतेच्या पैशाचा चुराडा झाला आहे. या नियोजनशून्य कामाला प्रशासनच जबाबदार आहे.
हे सर्व रस्ते एमएमआरडीए, एमआयडीसी आणि केडीएमसी यांनी बनविले होते. रस्ते बनविताना दुसऱ्या शासकीय यंत्रणांशी समन्वय न साधल्याने आता ते तोडावे लागत असून, भविष्यात आणखी अनेक रस्ते तोडावे लागणार आहेत. त्यामुळे या नव्या काँक्रीट रस्त्यांचा दर्जा खराब होणार असून, काही वर्षांत पुन्हा नव्याने रस्ते बनवावे लागणार आहेत.