Monday, 9 February 2026

पडघा आर. के. पालवी इंग्रजी शाळेचा १९ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न !!

पडघा आर. के. पालवी इंग्रजी शाळेचा १९ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न !!

** मल्लखांब, कराटे व समूहनृत्यांतून विद्यार्थ्यांचा सामाजिक संदेश; विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळवणाऱ्यांचा सन्मान

भिवंडी, प्रतिनिधी (मिलिंद जाधव) :

भिवंडी तालुक्यातील पडघे येथील आर. के. पालवी विद्यामंदिर इंग्रजी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचा १९ वा वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी व रविवारी सायंकाळी बालाजीनगर, नगर पडघे येथील भव्य मैदानात मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य रवींद्र पालवी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व क्रीडाप्रात्यक्षिकांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. स्नेहसंमेलनात भारतीय सांस्कृतिक वारसा जतन करणारी नृत्ये, तसेच प्राचीन भारतीय क्रीडा प्रकार असलेल्या मल्लखांबाचे थरारक सादरीकरण करण्यात आले. लाकडी खांबावर व दोरीवर हवेत योगासने, कसरती व कुस्तीचे डाव दाखवत विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांकडून जोरदार दाद मिळवली. यासोबतच शारीरिक क्षमता, शिस्त व स्वसंरक्षण तंत्रांचे दर्शन घडवणारी कराटे कौशल्यांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. मोबाईलचे दुष्परिणाम, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, भारतीय सैनिकांचे शौर्य, शेतकऱ्यांचे जीवन, पंढरीची वारी, अपघात जनजागृती आणि मैत्रीचा संदेश अशा विविध विषयांवर आधारित समूहनृत्यांतून विद्यार्थ्यांनी प्रभावी सामाजिक संदेश दिला. पहिली ते दहावी तसेच अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

यावेळी संस्थेची उभारणी करताना आलेल्या अडचणी व संघर्षांविषयी संस्थापक रवींद्र पालवी यांनी मनोगत व्यक्त केले. वर्षभरात विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच उत्कृष्ट पालक म्हणून काही पालकांनाही गौरविण्यात आले. कार्यक्रमाला शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी पालवी विद्यामंदिर इंग्रजी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

पडघा आर. के. पालवी इंग्रजी शाळेचा १९ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न !!

पडघा आर. के. पालवी इंग्रजी शाळेचा १९ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न !! ** मल्लखांब, कराटे व समूहनृत्यांतून विद्यार्थ्यांचा साम...