जबलपूर येथे कुर्मी राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्राचा तलवार देऊन गौरव !!
जबलपूर (मध्यप्रदेश) | 4-5 एप्रिल 2026
अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे 46 वे राष्ट्रीय अधिवेशन मध्यप्रदेशातील जबलपूर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. देशभरातील विविध राज्यांमधून प्रदेश व जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने या अधिवेशनात सहभागी झाले होते.
या अधिवेशनात पटेल, पाटीदार, मराठा, कुणबी, कुर्मी, कुडुंबर, कुडमी, कापू, कम्मा, कलबी, कुलमी, ओक्का लिंगा, देवेंद्र कुल वेल्लालार, महतो, खंडायत, गुर्जर, नायक, नायडू आदी विविध समाजघटक कुर्मी या प्रातिनिधिक या नावात येत असून त्या सर्व प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. तसेच या समाजाच्या सर्व राज्यांच्या समित्यांचा सक्रिय सहभाग या कार्यक्रमात दिसून आला.
महाराष्ट्रात कुर्मी ( कुणबी मराठा ) महासभेचे संघटन मजबूत करण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे राज्याने देशात अव्वल स्थान मिळवले. प्रदेश अध्यक्ष संजय पाटील, यांच्या नेतृत्वाखाली युवा महासभा, महिला महासभा, विद्यार्थी महासभा, उद्योग महासभा, पुरोहित महासभा आणि कृषी महासभा या विविध शाखांद्वारे प्रभावीपणे कामगिरी करण्यात आली.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष आणि महासचिव यांच्या हस्ते प्रदेश अध्यक्ष संजय पाटील व युवा प्रदेश अध्यक्ष प्रमोद ठोंबे पाटील यांचा तलवार व पगडी देऊन विशेष गौरव करण्यात आला.
1894 मध्ये नोंदणीकृत असलेली ही महासभा विविध समाजघटकांच्या न्याय व हक्कांसाठी कार्यरत आहे. याच संस्थेने 1919 साली लखनौ येथे छत्रपती शाहू महाराजांना “राजश्री” ही उपाधी देऊन सन्मानित केले होते.
आत्तापर्यंत महाराष्ट्रातील आठ मान्यवरांनी या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज, स्व. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि देशाचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांचा विशेष उल्लेख केला जातो.
सौजन्य - जयेश शेलार (पाटील)
No comments:
Post a Comment