स्वच्छतेच्या नावाखाली आकारल्या जाणाऱ्या दोन रुपये करामुळे प्रवाशी, नागरिकांच्या खिशाला बसणार कात्री !!
** सर्व स्तरातून होतेय टीका.
उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थातच एस.टी. महामंडळाने १५ एप्रिलपासून तिकीटदरात वाढ लागू केली असून, त्याचा थेट परिणाम प्रवासी वर्गावर होत आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना मोफत असलेला एस.टी. प्रवास आता शुल्क भरून करावा लागणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या खिशाला कात्री बसणारं आहे. याशिवाय, एस.टी. बस व स्थानकांच्या स्वच्छतेसाठी प्रत्येकी दोन रुपये आकारले जाणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. परिणामी, स्वच्छतेच्या नावाखाली प्रवाशांवर आर्थिक भुर्दंड टाकण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे.
पूर्वी एस.टी. आगार व स्थानकांच्या स्वच्छतेसाठी नियमित कर्मचारी नेमलेले होते. त्यांच्या माध्यमातून बस, आगार आणि स्थानकांची साफसफाई सुरळीत पार पडत होती. मात्र काही वर्षांपूर्वी एस.टी. महामंडळाने ही जबाबदारी खासगी एजन्सीकडे सोपवली. एजन्सीद्वारे कामगार नेमून स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु वेतनाच्या प्रश्नामुळे हे कामकाज अडचणीत आले आणि कामगारांची संख्या कमी होत गेली. आता पुन्हा स्वच्छतेच्या खर्चासाठी थेट प्रवाशांकडून पैसे वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. तिकीटदरात वाढ करून दोन रुपये स्वच्छतेसाठी आकारले जात आहेत. यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेली मोफत प्रवास योजना देखील बदलण्यात आली असून, आता त्यांनाही दोन रुपये तिकीट म्हणून द्यावे लागणार आहेत. उरण ते पुणे तसेच इतर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना तिकिटामागे दोन रुपयांपासून १५ ते २० रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. महिला सन्मान योजनेंतर्गत पूर्वी असलेल्या तिकीट पेक्षा आता दर वाढले आहेत. उरण ते स्वारगेट पुणे, उरण ते अलिबाग प्रवासाचे तिकीट दर वाढले आहेत. तसेच अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत मोफत असलेला प्रवास आता किमान दोन रुपये खर्च करून करावा लागत आहे. दरम्यान, एस.टी. च्या स्वच्छतेसाठी पुन्हा एकदा खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे ही एजन्सी प्रत्यक्षात कितपत स्वच्छता राखते, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांकडून गोळा होणारा पैसा खासगी एजन्सीकडे वळवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू आहे. या निर्णयामुळे प्रवासी वर्गात नाराजीचे सूर उमटत असून, एस.टी. महामंडळाच्या या धोरणावर टीका होत आहे.महामंडळ ने स्वच्छतेसाठी नियुक्त केलेले खाजगी एजन्सी किती चांगल्या पद्धतीने काम करतात तसेच किती दिवस चांगल्या पद्धतीने काम करतात हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
No comments:
Post a Comment