*" सिद्धार्थ महाविद्यालयाच्या कनिष्ठ लिपिक, सौ. साक्षी सुभाष गायकवाड यांचा सेवानिवृत्ती समारंभ " !!
सिद्धार्थ महाविद्यालयाच्या कर्तव्यदक्ष कनिष्ठ लिपिक सौ. साक्षी सुभाष गायकवाड यांनी अत्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे त्यांचा २६ वर्षाचा प्रदिर्घ सेवाकार्यकाळ पूर्ण करून मंगळवार दि. ३०/६/२०२६ रोजी त्या सन्मानाने निवृत्त झाल्या. त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीयदेखिल आवर्जून उपस्थित होते. सर्वांसाठी दुपारी त्यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.
दोन तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या निरोपाच्या कार्यक्रमात अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. कारण त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालयात अत्यंत प्रामाणिकपणे व सचोटीने सलग्न २६ वर्षे सेवाकार्यकाळ पूर्ण केला. त्यांच्या प्रेमळ व नम्र स्वभावामुळे कार्यालयातील प्रत्येक कर्मचारी व शिक्षकांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. साक्षी म्याडम कधी कोणावर ओरडल्या किंवा रागवल्या नाहीत, त्यांचा सर्वांसोबतचा स्नेह, आई व मोठ्या बहिणी प्रमाणे होता व सदैव राहील असे एका कर्मचाऱ्याने व्यासपीठावरुन सांगताना अनेकांचे डोळे पाणावले. कॉलेजच्या कोणत्याही कार्यक्रमात एखादी जबाबदारी त्यांना दिली की त्या मनापासून व उत्तम प्रकारे पार पाडायच्या.
या प्रसंगी कॉलेजच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून त्यांना सुंदर भेटवस्तू, शाल व साडी देऊन त्यांचा प्राचार्य, उप प्राचार्य व जेष्ठ प्राध्यापक व प्राध्यापिकांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच काही कर्मचाऱ्यांनी त्यांना वैयक्तिक भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला व त्यांना निवृत्तीनंतरचे पुढील आरोग्यदायी व आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
त्यांच्या कुटूंबातील त्यांच्या यजमानांसह त्यांची मुलगी सृष्टी,मोठी बहिण व ननंद यांनीदेखिल त्यांच्या भावना व्यक्त करताना, साक्षी म्याडमनी नोकरी करताना कौटूंबिक जबाबदारी देखील उत्तमप्रकारे पार पाडली. तसेच त्यांच्या लाडक्या लेकीने देखील आपल्या आईचे तोंडभरून कौतुक करताना तिला गहिवरून आले.
शेवटी साक्षी म्याडमनी कॉलेजच्या सर्व कर्मचारी व शिक्षकांनी त्यांना आजपर्यंत केलेले सहकार्य व त्यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या मंगल भावनाबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले. शेवटी सर्वांनी त्यांना वाजतगाजत, जल्लोषात व नृत्य करत कॉलेजच्या गेटपर्यंत सोबत दिली व जड अंतःकरणाने त्यांचा निरोप घेतला.
डॉ. विष्णु ज. भंडारे
(प्रभारी प्राचार्य)
No comments:
Post a Comment