कल्याणच्या शिक्षिकेचा घोटी येथे मृतदेह आढळला ; हत्येचा संशय, पोलिसांकडून तपास सुरू !
कल्याण : संदीप शेंडगे
कल्याण येथील वेणूबाई पावशे विद्यालयाच्या शिक्षिका संगीता मारुती चंदनशिवे (वय ५३) या १४ जुलै २०२६ रोजी बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा मृतदेह १६ जुलै रोजी घोटी येथील एसएमबीटी हॉस्पिटलच्या कंपाऊंडबाहेर आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात हत्येचा संशय व्यक्त केला जात असून वाडीवरे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संगीता चंदनशिवे या १४ जुलै रोजी नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत हजर झाल्या होत्या. दुपारी शाळा सुटल्यानंतर त्या एलआयसीच्या कामानिमित्त आसनगाव येथे गेल्या होत्या. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला आणि त्या बेपत्ता झाल्या असल्याची कुटुंबीयांनी माहिती दिली.
तपासादरम्यान त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन जोंधळे पॉलिटेक्निक स्कूलजवळील मुंबई-नाशिक महामार्ग परिसरात आढळून आले. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाल्याचे समोर आले आहे.
आसनगाव येथे त्या कोणाला भेटल्या, आसनगाव ते घोटी हा प्रवास त्यांनी कोणासोबत केला, तसेच प्रवासादरम्यान अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली का, आणि त्यानंतर मृतदेह एसएमबीटी हॉस्पिटल परिसरात आणून टाकण्यात आला का, या सर्व बाबींचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. तसेच त्यांच्या अंगावर मारल्याच्या खुणा असून हाताला व पायाच्या मार लागल्याचे दिसून आले
या घटनेमुळे कल्याणमधील शिक्षकवर्ग तसेच नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून दोषींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणाचा तपास वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण लहामाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, तपासानंतरच मृत्यूमागील नेमके काय घडले याचा सखोल तपास करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
No comments:
Post a Comment