बारावी जलशुद्धीकरण केंद्रातील उल्हास नदीपात्रातील मुख्य जलवाहिनी फुटली !!
** कल्याण-डोंबिवलीत पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम
कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या उल्हास नदीपात्रातून जाणारी मुख्य जलवाहिनी अचानक फुटल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे ४८ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
त्यामुळे खडकपाडा उंबर्डे, सापर्डे, कल्याण पश्चिम तसेच काही प्रमाणात डोंबिवली येथील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुख्य जलवाहिनीला तांत्रिक बिघाड झाल्याने अनेक भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे, तर काही भागांत कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा वापर अत्यंत जपून करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जलवाहिनी नदीपात्रात असल्याने दुरुस्तीचे काम आव्हानात्मक ठरत असून संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अभियंते आणि कर्मचारी अखंडपणे कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय होणार असून आवश्यकतेनुसार पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याबाबतही प्रशासन विचार करत आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता उदय सूर्यवंशी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment