अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन; भिवंडीत दोन आस्थापनांचा वीजपुरवठा खंडित !!
महानगरपालिकेची संयुक्त कारवाई; नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाईचा इशारा
प्रतिनिधी भिवंडी
दिनांक 17 जुलै 2026
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या निर्देशानुसार अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाने शहरातील विविध औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांची अग्निसुरक्षा तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. या तपासणीत अग्निसुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना न केलेल्या तसेच अग्निशमन विभागाचा ना-हरकत दाखला (NOC) न घेतलेल्या आस्थापनांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
महानगरपालिकेने महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६, सुधारित अधिनियम २०२३ आणि नियम २०२५ अंतर्गत संबंधित आस्थापनांना नोटिसा बजावून अग्निसुरक्षा यंत्रणा उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे.
याच मोहिमेअंतर्गत गुरुवार, १६ जुलै २०२६ रोजी कल्याण रोडवरील नारायण भोईर कंपाऊंड येथे अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग, कुंभारवाडा पोलीस ठाणे आणि टोरंट पॉवरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईदरम्यान मेसर्स एक्सेल इलेक्ट्रोकेम टेक्नॉलॉजी (युनिट क्र. २) आणि मेसर्स क्रेस्कोनंट इंडिया प्रा. लि. या दोन आस्थापनांचा वीजपुरवठा खंडित करून आस्थापने सील करण्यात आली.
महानगरपालिकेने शहरातील सर्व औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनाधारकांना आवाहन केले असून, अशा प्रकारच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग, परवाना विभाग आणि करमूल्यांकन विभागाशी संपर्क साधून आवश्यक परवाने, अग्निशमन ना-हरकत दाखला (NOC) तसेच घरपट्टीसह इतर थकबाकीची पूर्तता करावी, असे स्पष्ट केले आहे.
महानगरपालिकेने इशारा दिला आहे की, अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध पुढील काळातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे. त्यामुळे सर्व आस्थापनांनी अग्निसुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळून आवश्यक परवानग्या तातडीने प्राप्त कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment