कल्याण-डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवकाकडून डॉक्टर व नर्सना मारहाण; डॉक्टरांचा कामबंद आंदोलन !!
*डोंबिवली, विनोद गीरी* : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कोपरा परिसरातील शास्त्रीनगर रुग्णालयात सोमवारी सायंकाळी लज्जास्पद प्रकार घडला. शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयात जाऊन दोन डॉक्टर व दोन परिचारिकांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
*प्रसंग काय घडला?*
सोमवारी प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेचे सीझर करण्यात आले होते. नवजात बाळाच्या नाळेला दोन फेऱ्या असल्याने त्याला विशेष उपचारांची गरज होती. मात्र रुग्णालयातील अति दक्षता विभाग पूर्ण भरलेला असल्याने डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंखे यांनी बाळाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
या वेळी नातेवाईकांनी स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला. डॉक्टर रुग्णसेवेत व्यस्त असल्याने त्यांनी फोनवर प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर नगरसेवक रुग्णालयात पोहोचून शिवीगाळ करत डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण केली, असा आरोप करण्यात आला आहे.
*प्रशासनाकडे तक्रार, गुन्हा दाखल नाही*
घटनेची माहिती तातडीने महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांना देण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला, जखमी डॉक्टर व कर्मचारी यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
*डॉक्टरांचा कामबंद आंदोलन*
या मारहाणीच्या निषेधार्थ सर्व शासकीय रुग्णालये व आरोग्य केंद्रांतील डॉक्टर व परिचारिकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलनामुळे ओपीडी सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली असून केवळ इमर्जन्सी सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment