*धर्मवीर आनंद दिघे उद्यानाला पुन्हा टाळे; निवासी नागरिक वैतागले, 26 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा !!
*डोंबिवली, दि. 13 ऑगस्ट 2026*
डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील केडीएमसीच्या धर्मवीर आनंद दिघे उद्यानाला गेल्या वर्षभरात वारंवार टाळे लावून बंद ठेवले जात असल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. येथील नागरिक धर्मवीर आनंद दिघे यांचे नुसते नाव घेऊन सध्याच्या राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधी यांनी आतातरी थोडी लाज बाळगत या उद्यानावर लक्ष द्यावे असे म्हणत आहेत तसेच हे उद्यान तातडीने नियमितपणे सुरू न केल्यास 26 ऑगस्टला धर्मवीर आनंद दिघे यांच्या 25 व्या पुण्यतिथीला उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठे आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि स्थानिक सामाजिक संघटनांनी दिला आहे.
*उद्यानाचा इतिहास*
धर्मवीर आनंद दिघे उद्यानाची उभारणी 2002 साली तत्कालीन शिवसेना नगरसेवक श्री. भालचंद्र म्हात्रे यांच्या प्रयत्नातून झाली होती. त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि माजी आमदार श्री. राजू पाटील यांनी सुशोभीकरणासाठी सुमारे 50 लाख रुपयांचा निधी दिला होता. यात जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांची खेळणी आणि विविध झाडे लावण्यात आली होती. केडीएमसीने यासाठी एक कंत्राटी सुरक्षा रक्षकही नेमला होता.
*गेल्या वर्षभरापासून बंदची समस्या*
गेल्या वर्षभरापासून सुरक्षा रक्षकाचा ठेका संपल्याने उद्यान सकाळ-संध्याकाळ उघडले जात नव्हते. मध्यंतरी काही दिवस स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या जबाबदारीवर उद्यान सुरू ठेवले. मात्र साफसफाई, झाडांना पाणी न मिळाल्याने आणि उद्यानात प्रेमी युगल व नशेखोर व्यक्तींचा वावर वाढल्याने पुन्हा उद्यान बंद करण्यात आले. त्यामुळे बालगोपाळ आणि ज्येष्ठ नागरिकांना फटका बसत आहे.
*आश्वासनानंतरही परिस्थिती जैसे थे*
काही दिवसांपूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सोशल मीडियावर उद्यानात सुरक्षा रक्षक नेमल्याचे पत्र आणि फोटो शेअर केले होते. त्यामुळे उद्यान आता नियमित सुरू राहील अशी अपेक्षा होती. मात्र पुन्हा उद्यान बंद असल्याने नागरिकांचा संयम सुटला आहे.
*नागरिकांच्या प्रमुख मागण्या*
1. उद्यान दररोज सकाळ आणि संध्याकाळ नियमित वेळेत सुरू ठेवावे
2. उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ दर्शवणारा फलक प्रवेशद्वारावर लावावा
3. उद्यानातील वाढलेले गवत आणि झाडी झुडपे कापून साफसफाई करावी
4. कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी
*26 ऑगस्टला आंदोलन*
उपविभाग प्रमुख मंदार स्वर्गे, शाखाप्रमुख सागर पाटील, महिला आघाडी विभाग संघटक सौ. रजनी कुचे, माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, माजी विभाग प्रमुख राजू नलावडे आणि असंख्य शिवसैनिक 26 ऑगस्ट रोजी धर्मवीर आनंद दिघे यांच्या 25 व्या पुण्यतिथी दिवशी उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर धर्मवीर आनंद दिघे यांना श्रद्धांजली वाहून त्यानंतर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात इतर स्थानिक सामाजिक संघटना आणि नागरिकही सहभागी होणार आहेत.
वृत्त - समाजसेवक राजू नलावडे (डोंबिवली)
No comments:
Post a Comment