Wednesday, 12 August 2026

झेंडावंदनाचा 'भादाणे पॅटर्न' ठरतोय देशपातळीवर आदर्श; विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर चर्चेत !!

झेंडावंदनाचा 'भादाणे पॅटर्न' ठरतोय देशपातळीवर आदर्श; विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर चर्चेत !!

.               भादाणे गावाचे मा. सरपंच श्री संजय हांडोरे पाटील 

*ठाणे, प्रतिनिधी :

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण कोणाच्या हस्ते करावे यावरून अनेक ठिकाणी वाद होतात. मात्र ठाणे जिल्ह्यातील भादाणे गावाने यावर क्रांतिकारी तोडगा काढला आहे. गावात राबवला जाणारा 'भादाणे पॅटर्न' आता महाराष्ट्राबाहेरही आदर्श म्हणून पाहिला जात असून सामाजिक संघटनांकडून हा राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

*काय आहे 'भादाणे पॅटर्न'?*  
ऑगस्ट 2015 मध्ये भादाणे गावातील जिल्हा परिषद शालेय शिक्षण समितीने ऐतिहासिक ठराव मंजूर केला. त्यानुसार शाळेतील ध्वजारोहणाचा पारंपारिक अधिकार लोकप्रतिनिधी किंवा सरपंचांऐवजी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात आला.

नियम पुढीलप्रमाणे:
- *इयत्ता 10 वी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण*
- *इयत्ता 12 वी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण*  
हे ध्वजारोहण विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांसोबत केले जाते.

भादाणे गावाचे माजी सरपंच आणि शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. संजय हंडोरे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि तत्कालीन मुख्याध्यापक राजाराम कंटे सर यांच्या सहकार्यातून हा उपक्रम सुरू झाला.

*परराज्यातही गाजला भादाणे पॅटर्न*  
या अनोख्या उपक्रमाची दखल थेट उत्तर प्रदेशमध्येही घेण्यात आली. उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री मा. आशिष पटेल यांनी 4 फेब्रुवारी 2024 रोजी लखनौ येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात 'भादाणे पॅटर्न'चे जाहीर कौतुक केले. यावेळी या संकल्पनेचे जनक संजय हंडोरे पाटील यांचा सन्मानही करण्यात आला.

ठाणे जिल्हा परिषदेनेही सर्वसाधारण सभेत या निर्णयाचे कौतुक करून हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावा अशी विनंती राज्य शासनाकडे केली आहे.

*गावात उमटले सकारात्मक पडसाद*
1. *गुणवत्तेत वाढ*: ध्वजारोहणाचा मान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढली आहे.
2. *वादाला पूर्णविराम*: ध्वजारोहण कोण करणार यावरून होणारे राजकीय वाद थांबले आहेत.
3. *निकोप स्पर्धा*: परीक्षेत प्रथम येण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण झाली आहे.
4. *पालकांचा सन्मान*: गुणवंत मुलांमुळे आई-वडिलांना जाहीर व्यासपीठावर मान मिळत आहे.
5. *आत्मविश्वास*: ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये नवी प्रेरणा आणि आत्मविश्वास वाढला आहे.

देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय असल्याने विविध सामाजिक संघटनांकडून हा पॅटर्न राज्यातील आणि देशातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये बंधनकारक करावा अशी आग्रही मागणी शासनाकडे केली जात आहे. 

शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख श्री. काशिनाथ हिरु शेलवले यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी; रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक !

उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी; रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक ! ** उलवे शहर मनसे तर्फे सत्कार. उरण दि...