Thursday, 13 August 2026

उरण नगरपरिषदेत वारस हक्काने १९ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती.

उरण नगरपरिषदेत वारस हक्काने १९ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती.

२ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांच्या प्रयत्नामुळे मार्गी.

उरण दि १४(विठ्ठल ममताबादे) गेली २ वर्षे प्रलंबित असलेली वारसा हक्काची नोकरीची समस्या मार्गी लागल्याने सदर निर्णय व नियुक्ती उरण नगरपरिषद आणि १९ नव्याने रुजू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा ठरला.

 मुंबई उच्च न्यायालयचे औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आदेश आणि महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिलेले आदेश व संबंधित गरपालिका प्रशासन संचालनालयाने दिलेल्या प्रशासकीय आदेशांच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसांना "वारस हक्क" योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या १९ उमेदवारांनी आज उरण नगरपरिषदेत सफाई कर्मचारी या पदावर अधिकृतपणे रुजू होऊन आपल्या सेवेला प्रारंभ केला. 

सुमारे २ वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सन्माननीय नगरसेवक गणेश शिंदे, अतूल ठाकूर, प्रमिला पवार, मंगेश कासारे यांनी सभागृहात उपस्थित केला. या प्रसंगी नगरसेविका प्रमिला पवार यांनी नगरपरिषद सभागृहात कागदोपत्री पुराव्यासह प्रभावीपणे बाजू मांडली. त्यावेळी  नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी या संदर्भात वरिष्ठ कार्यालय नगरपालिका प्रशासन संचालनालयाकडे पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे पत्रव्यवहार करून आयुक्त तथा संचालक  अभिषेक कृष्णा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी देण्याबाबतचा अन्याय दूर करण्याची विनंती करण्यात आली. 

 नगराध्यक्षा  भावनाताई घाणेकर यांच्या विऩंतीला मान देऊन तात्काळ  आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांनी उरण नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिल्यामुळे अखेर १९ सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आणि एकूण १९ वारस रुजू होऊन कर्तव्याला सुरुवात केली आहे.

 नवीन कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि कुटुंबियांच्या समाधानामुळे हा क्षण अधिक संस्मरणीय ठरला. 

याप्रसंगी या संपूर्ण प्रक्रियेत न्यायालयात या विषयावर सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार आणि सरचिटणीस अनिल जाधव यांनी नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले.

ही केवळ नोकरीची सुरुवात नसून अनेक कुटुंबांच्या आयुष्यात स्थैर्य, स्वाभिमान आणि नव्या आशेचा किरण घेऊन आलेला दिवस आहे. नगरपरिषदेची स्वच्छता आणि नागरिकांची सेवा या नव्या कर्मचाऱ्यांमुळे अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.नवीन जबाबदारी स्वीकारलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना उत्तम आरोग्य, यश आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या

No comments:

Post a Comment

उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी; रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक !

उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी; रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक ! ** उलवे शहर मनसे तर्फे सत्कार. उरण दि...