नागपंचमीनिमित्त ‘सर्प – समज, गैरसमज आणि विज्ञान’ जनजागृती कार्यक्रम !
उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) : नागपंचमीनिमित्त सर्पांविषयीचे समज-गैरसमज दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून जनजागृती करण्याच्या उद्देशाने फ्रेंड्स ऑफ नेचर (FON) सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था, चिरनेर-उरण, रायगड (महाराष्ट्र) यांच्या वतीने ‘सर्प – समज, गैरसमज आणि विज्ञान’ या विषयावर तीन ठिकाणी विशेष जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत रयत शिक्षण संस्थेचे मॉडर्न स्कूल, वाशी, नवी मुंबई येथे व्याख्याते तुषार म्हात्रे, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिरकोन येथे जयवंत रामदास ठाकूर, तर पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल, पिरकोन येथे निकेतन रमेश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात सर्पांचे पर्यावरणातील महत्त्व, सर्पांविषयी प्रचलित गैरसमज व अंधश्रद्धा, सर्पदंशाची प्रतिबंधात्मक काळजी, योग्य प्रथमोपचार तसेच सर्प आणि मानव यांच्यातील सहजीवन याबाबत वैज्ञानिक माहिती देण्यात आली. सर्पांविषयीची अनावश्यक भीती दूर करून त्यांचे संवर्धन आणि मानवी सुरक्षितता यांचा समतोल साधण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
हा उपक्रम फ्रेंड्स ऑफ नेचर (FON) संस्थेच्या ‘शून्य सर्पदंश मृत्यू अभियान’ या व्यापक जनजागृती उपक्रमाचा भाग असून, संस्थेच्या Snakebite Action Team (S.A.T.) मार्फत सर्पदंशाच्या घटना कमी करण्यासाठी तसेच सर्पदंशामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी वैज्ञानिक माहिती समाजापर्यंत पोहोचविण्यात येत आहे.
या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. स्थानिक स्कूल समिती सदस्यांसह FON संस्थेचे S.A.T. स्वयंसेवक हृषिकेश म्हात्रे आणि जय गायकवाड यांचीही यावेळी उपस्थिती होती.
नागपंचमीच्या पारंपरिक सणाला वैज्ञानिक जनजागृतीची जोड देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘सर्प वाचवा, अंधश्रद्धा दूर करा आणि सर्पदंशाने होणारे मृत्यू थांबवा’ असा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
No comments:
Post a Comment