*पनवेल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांनीच हाती घेतली रस्ता दुरुस्ती; टेंभोडे मार्गावर स्वखर्चातून डागडुजी !!
(महेंद्र उर्फ अण्णा पंडीत)
*पनवेल / टेंभोडे,*: पनवेल - टेंभोडे मार्गावरील एक्सप्रेस हायवे ब्रिजखालील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांनीच अखेर पुढाकार घेत स्वखर्चाने रस्त्याची डागडुजी केली आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पनवेल-टेंभोडे मार्गावरील एक्सप्रेस हायवे ब्रिजखाली गेल्या अनेक दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेक वाहनांचे नुकसान झाले, तर गंभीर अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली होती. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नव्हती.
अखेर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने या प्रकरणाची माहिती जनहक्क अधिकार संघर्ष सामाजिक संस्थेचे पदाधिकारी श्री. राज भोईर यांना देण्यात आली. नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत श्री. राज भोईर यांनी प्रशासनाच्या दुरुस्तीची वाट न पाहता तातडीने स्वखर्चातून जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याची तात्पुरती डागडुजी करून घेतली.
या सामाजिक कार्यात कुणाल भोईर, आकाश गायडवाड, संकेत भोईर, ओमकार भोईर, केतन ठाकूर, आकाश गंडगे व निशांत कडू तसेच इतर नागरिक आणि स्थानिक ग्रामस्थांनी प्रत्यक्ष श्रमदान करून सहभाग घेतला. त्यांच्या या पुढाकारामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून, संभाव्य अपघात आणि वाहनांचे नुकसान काही प्रमाणात टाळण्यास मदत झाली आहे.
*"नागरिकांनी आंदोलन करावे की अपघाताची वाट पाहावी?" - संतोष चाळके*
यावेळी जनहक्क अधिकार संघर्ष सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष चाळके यांनी प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.
"नागरिकांच्या करातून चालणाऱ्या शासकीय यंत्रणेला रस्त्याची मूलभूत देखभाल करण्यासाठी तरी नागरिकांनी आंदोलन करावे लागते का, की एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे? 'रस्ता आमचा, जबाबदारीही आमची' ही भूमिका घेऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आणि नागरिकांना स्वखर्चाने रस्ता दुरुस्त करण्याची वेळ येणे, ही PWD प्रशासनासाठी लाजिरवाणी आणि गंभीर बाब आहे," असा घणाघात त्यांनी केला.
*कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा*
तात्पुरत्या डागडुजीमुळे जरी दिलासा मिळाला असला तरी हा कायमस्वरूपी उपाय नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून कायमस्वरूपी आणि दर्जेदार डागडुजी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
या दुर्लक्षाची दखल घेऊन जनहक्क अधिकार संघर्ष सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) व संबंधित पनवेल विभागाचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही संस्थेने दिला आहे.
नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेस संबंधित विभागच पूर्णपणे जबाबदार असेल, असा इशारा संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment