पडघ्यात ८० वर्षांची परंपरा कायम; कृष्ण जन्मोत्सव अन्
दहीहंडीचा रंगला उत्सव !!
भिवंडी प्रतिनिधी (मिलिंद जाधव)
भिवंडी तालुक्यातील पडघा व परिसरात विविध मंडळे, राजकीय पक्ष, सार्वजनिक मित्रमंडळांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोविंदा पथकांच्या जल्लोषाने आणि ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने संपूर्ण पडघा परिसर दुमदुमून गेला.
दहीहंडी उत्सवानिमित्त सकाळपासूनच पडघा बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते. पडघे गावात गेल्या ८० वर्षांपासून सुरू असलेली कृष्ण जन्म महोत्सवाची परंपराही यंदाही मोठ्या उत्साहात कायम राखण्यात आली. सुदर्शन नगर येथून संपूर्ण पडघे गावातून श्रीकृष्ण भगवानांची वेशभूषा केलेल्या बालकृष्णाची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक वाजत-गाजत काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या कृष्ण जन्म महोत्सवात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पडघा शहर व विभाग, सिद्धिविनायक प्रतिष्ठान, एकता मित्रमंडळ यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि सार्वजनिक मित्रमंडळांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
दहीहंडी फोडण्यासाठी ओमसाई गोविंदा पथक, जय बजरंग गोविंदा पथक, सुदर्शन गोविंदा पथक यांसह विविध गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पथकांनी एकामागून एक थर रचत उंच मानवी मनोरे उभारले आणि दहीहंडीला दिमाखदार सलामी दिली. डीजेच्या तालावर थिरकणारे तरुण, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषामुळे वातावरणात उत्साह संचारला होता. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी थरावर थर रचत आपले कौशल्य आणि शारीरिक सामर्थ्य पणाला लावले. उंच मनोरे रचून हंडी फोडण्याचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पडघ्यातील बस स्थानक, विद्यानगर, शीतल शरद अपार्टमेंट यांसह विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केल्याने उत्सवाला आणखी रंगत आली. गोविंदा पथकांच्या धाडसी कामगिरीला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्स्फूर्त घोषणांनी दाद दिली. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी दहीहंडी उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. परंपरा, उत्साह, साहस आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देत पडघ्यातील दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
No comments:
Post a Comment