Tuesday, 13 October 2026

मर्जीतल्या ठेकेदारांना कामे मिळवून देण्यासाठी आमदार निलेश राणेंचा अधिकाऱ्यांवर दबाव - वैभव नाईक यांचा आरोप

मर्जीतल्या ठेकेदारांना कामे मिळवून देण्यासाठी आमदार निलेश राणेंचा अधिकाऱ्यांवर दबाव - वैभव नाईक यांचा आरोप

*कुडाळ प्रतिनिधी :* गेली दोन वर्षे आमदार निलेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक कुडाळ-मालवणमधील विकासकामांमध्ये हस्तक्षेप करून प्रत्येक काम आपल्या मर्जीतील ठेकेदारांना मिळवून देऊन त्यांच्याकडून टक्केवारी घेत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

निलेश राणे यांनी सा.बां. विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेले पत्र व्हायरल झाल्याचा दावा करत वैभव नाईक यांनी पुरावा सादर केला असून मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री यांनी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

वैभव नाईक म्हणाले, शासन निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक पद्धतीने व्हावी यासाठी प्रयत्न करत असताना निलेश राणे स्पर्धात्मक निविदा भरणाऱ्या ठेकेदारांवर दबाव टाकून निविदा मागे घेण्यास भाग पाडत आहेत. एखाद्याने न ऐकल्यास अधिकाऱ्यांना पत्रे देऊन निविदा रद्द करण्यासाठी दबाव टाकला जातो.

सार्वजनिक बांधकाम, समाजकल्याण, जिल्हा परिषद या विभागांतील कामे मर्जीतल्या ठेकेदाराला मिळावीत यासाठी हा प्रकार सुरू आहे. अनेक कामांमध्ये ठेकेदारांनी कमी टक्के दराने निविदा भरूनही ते मर्जीतले नसल्याने कागदपत्रांत त्रुटी काढून निविदा रद्द करण्यात आल्या आणि फेरनिविदा काढून शासनाचे नुकसान करण्यात आले, असा आरोप नाईक यांनी केला.

कमी दराच्या निविदांवर डिपॉझिट घेण्याची आणि दर्जेदार काम करून घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असताना लोकप्रतिनिधी आणि अधिकारी संगनमत करून हस्तक्षेप करत असतील तर स्पर्धात्मक प्रक्रिया होणार नाही. "असेच करायचे असेल तर निविदाच काढू नका, हव्या त्या ठेकेदाराला काम देऊन कमिशन घ्या," असा टोलाही नाईक यांनी लगावला.

निलेश राणे यांचे सावंतवाडी सा.बां. कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेले पत्र आपण मुख्यमंत्र्यांना पाठवणार असून मर्जीतल्या ठेकेदारांना कामे मॅनेज करून देऊन कमिशन लाटले जात आहे. आधीची कामे अर्धवट टाकणाऱ्यांनाही पुन्हा कामे दिली जात असून या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

खरांगण येथील वयोवृद्ध महिला शेतकऱ्याच्या तक्रारीत सत्यता; कृषी विभागाची मोहर, जलसंधारण विभागाची पाहणी !!

खरांगण येथील वयोवृद्ध महिला शेतकऱ्याच्या तक्रारीत सत्यता; कृषी विभागाची मोहर, जलसंधारण विभागाची पाहणी !! *कल्याण (संजय कांबळे) :...