*सांगलीत अंनिसची राज्य कार्यकारिणी उत्साहात संपन्न; फटाकेमुक्त दिवाळीसह विविध अभियान राबवण्याचा निर्धार*
*सांगली :* महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची (अंनिस) दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठक सांगली येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात शनिवार, दि. 10 आणि रविवार, दि. 11 ऑक्टोबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. राज्यातील 20 जिल्ह्यांतील 46 शाखांमधून 226 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला, यात 34 महिला कार्यकर्त्यांचा समावेश होता.
राज्य अध्यक्षा प्राचार्य प्रमोदिनी मंडपे, डॉ. शैला दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, मिलिंद देशमुख, अण्णा कडलासकर, फारुख गवंडी, नंदिनी जाधव यांच्यासह ट्रस्टी गणेश चिंचोले, दीपक गिरमे, रमेश माणगावे आणि विविध विभागांचे कार्यवाह उपस्थित होते.
*शहीद विचारवंतांच्या चरित्रग्रंथांचे प्रकाशन*
शनिवारी सकाळी प्रमुख पाहुणे डॉ. बाबुराव गुरव, सुभाष बापू पाटील आणि व्ही. वाय. पाटील यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या चार शहीद विचारवंतांच्या चरित्रग्रंथांचे प्रकाशन करून बैठकीचे उद्घाटन झाले. त्यानंतर जिल्ह्यांचे कार्यअहवाल सादर झाले व मुक्ता दाभोलकर यांनी संघटनेची रचना आणि कार्यपद्धतीवर मार्गदर्शन केले.
सायंकाळी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचे 'माध्यमांचे वर्तमान' या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी 'प्रा. प. रा. आर्डे स्मृती प्रेरणा पुरस्कार' पत्रकार गणेश कांबळे यांना प्रदान करण्यात आला. रात्री कार्यकर्त्यांनी चळवळीची गीते व नव्या चमत्कारांचे प्रात्यक्षिक सादर केले.
*रविवारची सत्रे आणि प्रमुख निर्णय*
रविवारी सकाळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय निटवे यांनी 'भ्रामक गर्भसंस्कार' विषयावर प्रबोधन केले. त्यानंतर बुवाबाजी संघर्ष, संघटन बांधणी, महिला, युवा, प्रकाशन, सांस्कृतिक, सोशल मीडिया आदी विभागांचा आढावा घेण्यात आला.
*बैठकीत घेण्यात आलेले प्रमुख निर्णय :*
*1. फटाकेमुक्त दिवाळी अभियान :* शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येणार असून आवाहनपत्रावर प्रकाश आमटे, अच्युत गोडबोले, सोनाली कुलकर्णी आणि नागराज मंजुळे यांच्या सह्या घेण्याचे नियोजन.
*2. व्यसनमुक्ती अभियान :* 31 डिसेंबर रोजी 'चला व्यसनाला बदनाम करूया - दारूचा नव्हे, दुधाचा प्याला' हा उपक्रम राज्यभर राबवणार.
*3. सोशल मीडियावर प्रभावी प्रचार :* वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचवण्यासाठी स्वतंत्र टीम तयार करून प्रशिक्षण देणार.
*4. बुवाबाजीविरोधी संघर्ष :* सोशल मीडियावरील रील्समधून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या बुवा-बाबांविरोधात पोलिसांना निवेदन देण्याचा निर्णय.
*5. कार्यकर्ता प्रशिक्षण :* जिल्हानिहाय शिबिरे आणि शाखांशी नियमित संपर्कासाठी ऑनलाइन बैठका.
*6. नरेंद्र दाभोलकर लोक विद्यापीठ :* AI च्या मदतीने नवीन अभ्यासक्रम विकसित करणे आणि संत-समाजसुधारकांवरील प्रत्येकी दहा पुस्तकांचे दोन संच प्रकाशित करणे.
*7. प्रकाशन व आदिवासी प्रबोधन :* 'अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा'च्या वार्षिक अंकासाठी जाहिरात व देणगी संकलन आणि आदिवासी आश्रमशाळांमधील प्रबोधन कार्यक्रम सुरू ठेवणे.
*32 हजारांच्या पुस्तक विक्रीसह सांगली टीमचे कौतुक*
या दोन दिवसांत तब्बल 32 हजार रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली. सांगलीच्या स्थानिक टीमने निवास, भोजन, रेल्वे स्थानकावरून आणणे-नेणे अशा सर्व जबाबदाऱ्या आपुलकीने पार पाडल्या.
समारोप सत्रात अध्यक्षा प्रमोदिनी मंडपे यांनी चळवळ अधिक जोमाने पुढे नेण्याचे आवाहन केले. 'हम होंगे कामयाब एक दिन' या सामुदायिक गीताने बैठकीची सांगता झाली.
No comments:
Post a Comment