*'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत उल्हासनगरमध्ये अनाथालये व वृद्धाश्रमांना भेटी; निराधारांना दिला आधार*
*उल्हासनगर :* उल्हासनगर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभाग आणि मालमत्ता विभागाच्या वतीने 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत शहरातील विविध अनाथालये, वृद्धाश्रमे आणि शासकीय वसतीगृहांना भेटी देऊन सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाद्वारे गरजू, निराधार वृद्ध आणि बालकांच्या समस्या जाणून घेत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अभियानांतर्गत शहरातील खाजगी, निमशासकीय आणि शासकीय संस्थांना भेटी देण्यात आल्या. यामध्ये उल्हासनगर-4 मधील संभाजी चौकाजवळील सिंधू वर्षा फाऊंडेशन वृद्ध महिला आश्रम, उल्हासनगर-5 येथील स्वामी शांती प्रकाश आश्रम ट्रस्ट (वृद्ध पुरुष व महिला आश्रम), तसेच उल्हासनगर-3 मधील ओटी सेक्शन येथील प्रेम कुंज आश्रम या खाजगी वृद्धाश्रमांचा समावेश आहे. यासोबतच उल्हासनगर-4 मधील भीमनगर कॉलनीतील विश्रांती वृद्धाश्रम आणि उल्हासनगर-5 येथील महिलांसाठीचे 'शासकीय शांती सदन' वसतीगृहालाही भेट देऊन सोयीसुविधांची पाहणी करण्यात आली.
तसेच बालकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या महिला व बाल विकास विभागाच्या शासकीय मुलांचे बालगृह (वरिष्ठ), बॅरेक 1760/61 (भूमी अभिलेख कार्यालयाजवळ, गांधी रोड) आणि शासकीय मुलांचे बालगृह (कनिष्ठ व वरिष्ठ), बॅरेक 1726/27 (तहसील कार्यालयाच्या पाठीमागे, गांधी रोड) यांना भेटी देऊन बालकांच्या निवास व शिक्षणाची माहिती घेण्यात आली.
हा संपूर्ण उपक्रम महिला व बाल कल्याण विभागाचे विभाग प्रमुख अनिल खतुरानी आणि मालमत्ता विभाग प्रमुख छाया डांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या उपक्रमामुळे निराधार वृद्ध आणि बालकांना प्रशासनाकडून मोठा आधार मिळाला असून सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment