*पूर्णेकर हत्याकांडात कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, पण शिंदेंना बदनाम केल्यास जशास तसे उत्तर देऊ - आमदार राजेश मोरे*
*डोंबिवली, प्रतिनिधी :* ठाण्यातील बहुचर्चित पूर्णेकर हत्याकांड प्रकरणात पूर्णेकर कुटुंबीयांना प्रत्येक परिस्थितीत न्याय मिळालाच पाहिजे, मात्र या हत्याकांडाच्या निमित्ताने जर कोणी शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देईल, असा थेट इशारा कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी विरोधकांना दिला.
डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी आमदार मोरे म्हणाले, "पूर्णेकर हत्याकांडाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. तपासात जो कोणी दोषी आढळेल त्याला शिक्षा होणारच आहे. मात्र या हत्याकांडाचा आधार घेऊन जर कोणी शिवसेनेचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल."
"आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ते आहोत. एकनाथ शिंदे हे आमच्यासाठी दैवत आहेत. आमच्या दैवताची बदनामी आणि त्यांच्यावर लावले जाणारे बिनबुडाचे आरोप अजिबात सहन केले जाणार नाहीत. आम्हाला आमदारकी किंवा नगरसेवक पदापेक्षा शिवसेना अधिक प्रिय आहे," असेही ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे, रवि पाटील, नगरसेवक विकास म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment