डोंबिवली स्टेशन परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईत कसूर; पथक प्रमुख कादर रेवडी निलंबित !
*डोंबिवली, विनोद गिरी :* दि. 16 ऑक्टोबर रोजी अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त व ग प्रभागाचे सहायक आयुक्त यांनी डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील 150 मीटर प्रतिबंधित ना फेरीवाला क्षेत्रात पूर्वसूचना न देता खासगी वाहनाने पाहणी केली. यावेळी मधुबन गल्ली परिसरात महापालिका कर्मचारी उपस्थित असतानाही मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले.
या पाहणी दरम्यान रेल्वे स्थानक परिसरातील नागरिक व प्रवाशांना ये-जा करण्यास अडचण निर्माण होत असल्याचे दिसून आले. याबाबत पथक प्रमुख कादर रेवडी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.
ही बाब कर्तव्यपालनातील गंभीर कसूर, अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश तसेच प्रशासकीय जबाबदारीच्या दृष्टीने गंभीर स्वरूपाची असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यपालनाची सखोल चौकशी आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 56 (1) (ब) नुसार कादर रेवडी (कामगार - पथक प्रमुख) यांना आदेशाच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत ते निलंबित राहतील. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय अनधिकृत बांधकाम कार्यालय (मुख्यालय) राहील व वरिष्ठांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, तसेच या काळात कुठेही खासगी नोकरी व धंदा करता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment