बाजीप्रभू चौकातील टपऱ्या, फेरीवाले आणि पार्किंग कारवाईबाबत केडीएमसी व वाहतूक पोलिसांना निवेदन !
*डोंबिवली, प्रतिनिधी :* बाजीप्रभू चौक येथील केडीएमटी बस स्थानकाजवळील अनधिकृत टपऱ्या, फेरीवाले आणि अवैध पार्किंगच्या संदर्भात एमआयडीसी निवासी संघटना आणि मिलापनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनने आज शुक्रवारी केडीएमसी आणि वाहतूक पोलिसांना निवेदन दिले.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर आणि शहर वाहतूक शाखा, डोंबिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अहिरे यांची भेट घेऊन प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या स्वाक्षरीसह निवेदन सादर केले.
काल गुरुवारी, १५ ऑक्टोबर रोजी सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी बाजीप्रभू चौकातील काही टपऱ्यांवर कारवाई केली होती. त्याबद्दल त्यांचे आभार मानून उर्वरित टपऱ्या आणि फेरीवाल्यांवरही लवकर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. त्यांनी उर्वरित अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अहिरे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. बाजीप्रभू चौकात अवैध वाहन पार्किंगमुळे केडीएमटी बसेस उभ्या करण्यास अडचण येते, प्रवाशांना त्रास होतो आणि वाहतूक कोंडी निर्माण होते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावर कडक कारवाई करू, असे आश्वासन पोलिसांनी दिले.
यावेळी राजू नलावडे, वर्षा महाडिक, किशोर सोहनी, अभय दिघे, नारायण गायकवाड, राजाराम सकपाळ आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment