मुंबई प्रतिनिधी/ पंकज चव्हाण :
मुंबईचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक वास्तू, प्रसिद्ध पर्यटनस्थळे, सण-उत्सव आणि आधुनिकतेचे विविध पैलू विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC), पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘बहुरंगी मुंबईची रंगबेरंगी गोष्ट!’ ही संकल्पना असलेल्या या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळणार असून, मुंबईच्या पर्यटनवैभवाची ओळखही अधिक दृढ होणार आहे.
या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे तीन गट करण्यात आले आहेत. गट अ मध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मुंबईची प्रसिद्ध पर्यटनस्थळे’ हा विषय देण्यात आला आहे. गट ब मध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना ‘मुंबईतील सण आणि उत्सव – विविधतेत एकता’ या विषयावर चित्र साकारायचे आहे. तर गट क मध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मुंबई – वारसा आणि आधुनिकतेचा संगम’ हा विषय निश्चित करण्यात आला आहे.
प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी A3 आकाराचा कागद वापरणे बंधनकारक असून, केवळ हस्तचित्रित कलाकृती स्वीकारल्या जाणार आहेत. AI च्या साहाय्याने तयार केलेली चित्रे स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाहीत. चित्रकलेसाठी कोणतेही माध्यम वापरण्याची परवानगी आहे.
स्पर्धकांनी आपल्या चित्राची स्कॅन केलेली प्रत mumbaitourism@maharashtratourism.gov.in या ई-मेल पत्त्यावर पाठवायची आहे. ई-मेलमध्ये स्पर्धेचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता आणि संपर्क क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. तसेच चित्राची मूळ प्रत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुख्यालय, तिसरा मजला, ओरिएंटल बिल्डिंग, भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) इमारतीवर, आझाद मैदान, फोर्ट, मुंबई – ४००००१ या पत्त्यावर पाठवावी.
चित्रकृती पाठविण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ अशी असून, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे. अधिक माहितीसाठी ९४२५७१७५२९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मुंबईच्या ऐतिहासिक वारशापासून आधुनिक महानगराच्या बदलत्या रूपापर्यंतचे विविध पैलू चित्रांतून मांडण्याची संधी या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कल्पनाशक्तीला रंग देत मुंबईच्या वैभवाची रंगबेरंगी गोष्ट साकारावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment