Wednesday, 4 November 2026

मोठागाव रेल्वे क्रॉसिंगवरील चार पदरी उड्डाणपुलाला स्थायी समितीची मंजुरी; १९ वर्षांच्या पाठपुराव्याला यश, संपूर्ण डोंबिवलीला मिळणार दिलासा - दीपेश म्हात्रे

मोठागाव रेल्वे क्रॉसिंगवरील चार पदरी उड्डाणपुलाला स्थायी समितीची मंजुरी; १९ वर्षांच्या पाठपुराव्याला यश, संपूर्ण डोंबिवलीला मिळणार दिलासा - दीपेश म्हात्रे

*कल्याण डोंबिवली,  दीपक इंगळे*

*कल्याण-डोंबिवली :* कल्याण-डोंबिवलीच्या दळणवळण व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मोठागाव रेल्वे क्रॉसिंगवरील चार पदरी रेल्वे ओव्हर ब्रिजच्या (ROB) प्रस्तावाला आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोठागाव रेल्वे क्रॉसिंगवरील पुलाची संकल्पना सर्वप्रथम २००७ मध्ये तत्कालीन महापौर पुंडलिक म्हात्रे यांनी मांडली होती. त्यांनी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला असता २३ कोटी रुपयांचा निधी मंजूरही झाला होता. मात्र केंद्र सरकारच्या DFCCIL प्रकल्पामुळे या कामाला स्थगिती मिळाली. सुरुवातीला हा पूल सिंगल लेन करण्याचे नियोजन होते.

मात्र २०१३ पासून दिपेश पुंडलिक म्हात्रे यांनी या पुलासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू केला. भविष्यातील लोकसंख्या आणि वाहनांचा ताण लक्षात घेता सिंगल लेन पूल अपुरा ठरेल, अशी भूमिका घेत त्यांनी चार पदरी उड्डाणपुलाची मागणी लावून धरली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर २०१७ मध्ये चार पदरी पुलाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आणि पालिकेमार्फत जागाही निश्चित करण्यात आली.

या प्रकल्पासाठी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी निधी आणि मंजुऱ्यांसाठी सहकार्य केले.

या पुलासाठी लढताना २०१९ मध्ये महापालिका सभागृहात भूमिका मांडताना झालेल्या वादातून दिपेश म्हात्रे यांच्यावर भादंवि कलम ३५३ अंतर्गत गुन्हाही दाखल झाला होता. तरीही त्यांनी पाठपुरावा थांबवला नाही.

मानकोली पूल सुरू झाल्यानंतर मोठागाव क्रॉसिंगवरील ताण वाढला आहे. हा चार पदरी पूल पूर्ण झाल्यानंतर केवळ मोठागावच नव्हे, तर माणकोली, डोंबिवली पूर्व-पश्चिम आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार असून नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.

स्थायी समितीच्या मंजुरीबद्दल दिपेश म्हात्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रवींद्र चव्हाण, एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्थायी समिती सदस्य आणि प्रशासनाचे आभार मानले असून काम लवकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

मोठागाव रेल्वे क्रॉसिंगवरील चार पदरी उड्डाणपुलाला स्थायी समितीची मंजुरी; १९ वर्षांच्या पाठपुराव्याला यश, संपूर्ण डोंबिवलीला मिळणार दिलासा - दीपेश म्हात्रे

मोठागाव रेल्वे क्रॉसिंगवरील चार पदरी उड्डाणपुलाला स्थायी समितीची मंजुरी; १९ वर्षांच्या पाठपुराव्याला यश, संपूर्ण डोंबिवलीला मिळणार दिलासा - ...