Sunday, 27 June 2021

संकष्टी चतुर्थीलाही भाविकांनी घेतले बंद दाराडून बाप्पाचे दर्शन.. "भाविकांत नाराजी"... रिक्षा चालक आणि पुजा साहित्य विक्रेते शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत

संकष्टी चतुर्थीलाही भाविकांनी घेतले बंद दाराडून बाप्पाचे दर्शन..  "भाविकांत  नाराजी"... 

रिक्षा चालक आणि पुजा साहित्य विक्रेते शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत 


टिटवाळा, उमेश जाधव -: गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले मंदिर कधी उघडणार असा सवाल रवीवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त भक्तांनी सरकारला केला आहे. 

राज्यभरात कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी अनेक कडक निर्बंध लावण्यात आले होते. रुग्णांची आकडेवारी आटोक्यात आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी हे निर्बंध काही नियमावली ठरवून शिथील करण्यात आले. बियर बार, वाईन शॉप, बिअर शॉप, देशी दारूचे दुकाने हॉटेल, लग्नाचे हॉल, सलून पार्लर आदींना सरकारने काही नियमावली ठरवून  उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र मंदिरे उघडण्यात बंदी ठेवण्यात आली आहे. अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व नवसाला पावणारे म्हणून मोठी ख्याती पावलेले सिद्धिविनायक मंदिर टिटवाळा येथे आहे. हे मंदिर गेल्या दोन वर्षात केवळ तीन महिने सुरू होते.
मात्र मंदिरांच्या बाबतीत अजूनही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे रविवारी   टिटवाळा येथे संकष्टी चतुर्थीला आलेल्या भक्तगणांमध्ये नाराजीचा सूर होता. येथील श्री सिद्धिविनायक मंदिर हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे भाविकांना मंदिराच्या बाहेरील बंद दरवाजातूनच बाप्पाचे दर्शन घेऊन काहीशा नाराजीने माघारी परतावे लागल्याचे पाह्यला मिळाले.‌ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी होणार नाहीत असे कार्यक्रम टाळावेत असे जनतेला आव्हान केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून काही निर्बंध घालण्यात आले आहेत.  संकष्ट चतुर्थीला दरवेळी टिटवाळा येथील गणेश मंदिरात  मोठ्या प्रमाणात भाविक-भक्तांची गर्दी उसळत असते. परंतु शासनाच्या आदेशामुळे  टिटवाळा गणपती मंदिर परिसरात शुकशुकाट दिसून आले. मुख दर्शन घेण्यासाठी  काही तुरळ भक्तगण टिटवाळ्यात दाखल झाले. पण त्यांना नाराज होऊन बंद दरवाज्यातून दर्शन घेऊन परतावे लागले. तसेच येथील पुजा साहित्ये विक्रेत्ये व रिक्षा वहातूक यांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला आहे. 

 “संकष्ट चतुर्थी असूनही आज मंदिर बंद आहे. हे एक भाविक म्हणून त्रासदायक आहे, पण लवकरच हे संकट दूर होईल. हा बाप्पा दुःखहर्ता आहे. आलेले संकट लवकरच टळेल ” -  संजय पारेकर, भाविक

वटपौर्णिमेच्या पुर्व संधेला सावित्रीला आपले तोडलेले घर परत दिले बनवून.. आदिवासी विधवा महिलेचे घर लोकसहभागातून राहिले उभे..

वटपौर्णिमेच्या पुर्व संधेला सावित्रीला आपले तोडलेले घर परत दिले बनवून..

आदिवासी विधवा महिलेचे घर लोकसहभागातून राहिले उभे..


टिटवाळा, उमेश जाधव -: चवरे-म्हसरोंडी येथील वनविभागाच्या कारवाईत जमीनदोस्त केलेले सावित्री बबन फसाळे या कातकरी विधवा महिलेचे घर श्रमजीवी संघटनेच्या सावित्रीनी बांधून पूर्ण करून दिले. भर पावसात सदर घराचे काम पूर्ण केले. 


वनविभागाच्या कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चा मध्ये श्रमजीवी संघटनेचे जनरल सेक्रेटरी बाळाराम भाऊ यांनी ठरवल्या प्रमाणे शुक्रवार दिनांक २५ जून रोजी कल्याण तालुक्यातील असंख्य महिला कार्यकर्त्यां घर बांधणीसाठी उभ्या राहिल्या व सावित्री बाईच घर एका दिवसात उभ करून दिले.


भर पावसात आपला संसार उघड्यावर आलेल्या सावित्रीच्या डोळ्यात या वेळी आपलं घर परत उभ राहील म्हणून आनंदश्रू पहायला मिळाले. संघटनेच्या सभासद यांनी श्रमदानंतून हे घर पूर्ण करून दिले. यावेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने, जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, तालुका अध्यक्ष विष्णू वाघे, तालुका कातकरी घटक प्रमुख वासुदेव वाघे, विभागीय सचिव लक्ष्मण वाघे, जिजा वाघे, धाकळू शेळके, लक्ष्मी वाघे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखेर इंदिरानगर व सलमान चाळ वासियांच्या पाण्याचा प्रश्न सुटला : 'आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन कामाचा शुभारंभ संपन्न'!

अखेर इंदिरानगर व सलमान चाळ वासियांच्या पाण्याचा प्रश्न सुटला : 'आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन कामाचा शुभारंभ संपन्न'!


टिटवाळा, उमेश जाधव -: कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट असणारे मांडा- टिटवाळा येथील इंदिरानगर व सलमान चाल या ठिकाणच्या रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.‌ याबाबत  रहिवाशांनी स्थानिक आमदार यांच्या समोर समस्यांचा पाढा वाचला. आमदार भोईर यांनी कुठल्या बद्दल विचार न करता आपल्या आमदार निधीतून दहा लाखांचा निधी पाईपलाईनसाठी दिला असून, रविवारी  यांचा भूमिपूजन केला. 


गेली चार ते पाच वर्षापासून इंदिरानगर व सलमान खान येथील हजारो रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट असून देखील या रहिवाशांना  पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता.‌ 


याबाबत रहिवाशांनी शिवसेनेचे कल्याण उपशहर प्रमुख किशोर सुक्ला, नगरसेवक संतोष तरे व स्थानिक शिवसेना कार्यकर्ते दादा खिस्मतराव, ज्ञानेश्वर मढवी, विजय देशेकर, जयेश वाणी यांची भेट घेतली. त्यांनी आमदार भोईर यांची भेट घेऊन इंदिरानगर व सलमान चाळ येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मांडला. आमदार भोईर यांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता  इंदिरानगर येथील पाईप लाईन  कामासाठी दहा लाखाचा व सलमान चाळ मांडा पश्चिम करीता आठ लाखांचा आमदार निधी देण्याचे आश्वासन दिले. रवीवारी याच  पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी शिवसेना उपशहरप्रमुख किशोर सुक्ला, नगरसेवक संतोष तरे, माजी नगरसेवक मयूर पाटील, विभाग प्रमुख दादा खिस्मतराव, युवा सेनेचे जयेश वाणी, ग्राहक संरक्षणचे विजय देशेकर, उपविभागीय प्रमुख दिलीप पातकर, शाखा प्रमुख ज्ञानेश्वर मढवी, नरेश पाटील, बाळा भोईर, प्रल्हाद पाटील, युवा सेना कल्याण उपशहर प्रमुख प्रविण भोईर, उपविभाग प्रमुख रेवणनाथ पाटील, बिलाल खान, जक्की खलीफा आदींसह मान्यवरांसह कार्यकर्ते व रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई मधील "ताज हॉटेल'' मध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल कराडमधील मुलाने केल्याचे उघड.!

मुंबई मधील "ताज हॉटेल'' मध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल कराडमधील मुलाने केल्याचे उघड.!


अरुण पाटील, भिवंडी, दिं.27 : काही दिवसांपूर्वी मुंबईतील मंत्रालयामध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा मेल आला होता. या संदर्भात पुण्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा मुंबईतील कुलाबा परिसरातील " ताज हॉटेल " मध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी कॉल आला होता. दरम्यान, हा कॉल एका 14 वर्षीय लहान मुलाने केला असल्याचे माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

         ताज हॉटेलच्या कार्यालयात सदरचा निनावी कॉल आला होता. या कॉलद्वारे " ताज हॉटेल "मध्ये बॉम्ब ठेवला असल्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर तत्काळ यासंदर्भात मुंबई पोलिसांना याची सूचना देण्यात आली. यानंतर घटनास्थळी बॉम्ब शोधक व नाशक पथकाने जाऊन तपासणी केली. सदरचा हा कॉल बनावट असल्याचे समोर आले. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ताज हॉटेलची तपासणी केली असता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बॉम्ब आढळून आलेला नाही.

          " ताज "या पंच तारांकित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी फोन आल्यानंतर या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. या मध्ये आणखी एक खुलासा होत आहे. ताजच्या मॅनेजमेंटला आलेला कॉल हा एका लहान मुलाने केला होता, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सदर या कॉलद्वारे ताज हॉटेलमध्ये 2 बंदुकधारी व्यक्ती घुसणार असून, बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली होती.

         " ताज हॉटेल "ला धमकीचा कॉल केल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील कराड येथील 9 वीत शिकणाऱ्या मुलाची व त्याच्या वडिलांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. अल्पवयीन मुलाने ताज हॉटेलला कॉल करून या हॉटेलमध्ये दोन बंदूकधारी व्यक्ती शिरणार असून, बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी दिली होती. मात्र, या गोष्टीची कल्पना या मुलाच्या वडिलांना नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. सदरच्या या अल्पवयीन मुलाने फोन करून, ताज हॉटेलच्या मागच्या गेटवर सुरक्षा वाढवा, कारण 2 व्यक्ती मास्क घालून बंदूक घेऊन ताजमध्ये घुसणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, पोलिसांनी याचा तपास करत सदरच्या अल्पवयीन मुलाला शोधून काढले असून पुढील चौकशी सुरू आहे.

माणगांव तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्ष पदी संतोष सुतार तर उपाध्यक्ष पदी विश्वास गायकवाड यांची सर्वानुमते निवड ! नुतन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत !!

माणगांव तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्ष पदी संतोष सुतार तर उपाध्यक्ष पदी विश्वास गायकवाड यांची सर्वानुमते निवड  ! नुतन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत  !! 


       बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : रविवार दिनांक २७ जुन २०२१ रोजी माणगांव विश्राम गृह येथे माणगांव तालुका प्रेस क्लबच्या झालेल्या मिटिंग मध्ये माणगांव तालुका प्रेस क्लबची नुतन कार्यकारिणी प्रस्थापित करण्यात आली. सदर मिटिंग मध्ये सर्वानुमते माणगांव तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी संतोष सुतार तर उपाध्यक्ष पदी विश्वास गायकवाड व सौ. आरती म्हामुणकर, कार्याध्यक्ष पदी गौतम जाधव, सेक्रेटरी पदी हरेश मोरे, खजिनदार पदी सचिन वनारसे,प्रमुख संघटक पदी पदमाकर उभारे, प्रमुख  सल्लागार पदी उत्तम तांबे, कायदेशीर सल्लागार पदी डॉ.संजयजी सोनावाणे, प्रमुख सल्लागार पदी विनोद सापळे, सदस्य वैभव टेंबे, योगेश ढेपे आणि पूनम धुमाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 
     कोविड १९ च्या पार्श्वभूमीवरील शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून माणगांव तालुका प्रेस क्लब आयोजित सदर मिटिंग च्या सुरुवातीला कोविड १९ या आजाराने पत्रकारिता व अन्य क्षेत्रात काम करत असताना निधन झालेल्यांना माणगांव तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून अत्यंत दुःखद अंत करणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
      या नंतर माणगांव तालुका प्रेस क्लबची नुतन कार्यकारिणी प्रस्थापित करण्यात आली. नुतन कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी यांना त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्याच बरोबर मावळत्या कमिटीची सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या मिटिंग मध्ये रायगड प्रेस क्लब संलग्न माणगांवर प्रेस क्लब ची ध्येय, धोरणे आणि सामाजिक उपक्रम, तसेच रायगड प्रेस क्लब संचालित आदर्श शेतकरी पुरस्कार शेताच्या बांधावर या पुरस्कारासाठी माणगांव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी निवड करण्या संदर्भात नियोजन करण्यात आले. या नंतर सदर सभेची तथा मिटिंग ची सांगता करण्यात आली.

Saturday, 26 June 2021

नवी कोरोनाबाधित रुग्णसंख्या दहा हजाराच्या आसपास ! दिवसभरात 179 रुग्णांचा मृत्यू ; मृत्यूदर २ टक्के !

नवी कोरोनाबाधित रुग्णसंख्या दहा हजाराच्या आसपास ! दिवसभरात 179 रुग्णांचा मृत्यू ; मृत्यूदर २ टक्के !



मुंबई : महाराष्ट्रात आज (26 जून) दिवसभरात कोरोनाचे 9812 नवे रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात दररोज 10 हजाराच्या जवळपास नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे राज्यातील प्रशासनाची चिंता कायम आहे. दरम्यान, दिवसभरात 179 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,20,881 जणांचे कोरोनाने प्राण घेतले आहेत.

गेल्या 24 तासात राज्यात 9,812 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

राज्यात सध्या 1 लाख 21 हजार 251 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 8,752 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 57,81,551 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.93 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 179 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.0 टक्के एवढा आहे.

राज्यात आज विक्रमी लसीकरणाची नोंद ! तब्बल ७ लाख २६ हजार ५८८ नागरिकांना लस !!

राज्यात आज विक्रमी लसीकरणाची नोंद ! तब्बल ७ लाख २६ हजार  ५८८ नागरिकांना लस !!



मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात हाहाकार माजवला असतानाच देशात कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची लस आणि भारत बायोटेकची लस मोठ्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच काही भागांमध्ये रशियाच्या स्पुतनिक-वी या लसीला देखील देण्यास सुरुवात झाली आहे. देशात खूप वेगाने लसीकरण चालू आहे. अशातच आता महाराष्ट्र सरकारने आज लसीकरणाच्या बाबतीत नवीन विक्रम रचला आहे.

आज दिवसभरात महाराष्ट्रात तब्बल 7 लाख 26 हजार 588 नागरिकांना लस देण्यात आली आहे. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे.

लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र रोज नवीन विक्रम रचत असल्यानं सर्वच स्तरातून महाराष्ट्राची वाह वाह होत आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात 3 कोटी 9 लाख 79 हजार 460 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...