Monday, 28 November 2022

कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा वरप येथे संपन्न !

कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा वरप येथे संपन्न !

कल्याण, (संजय कांबळे) : क्रांतीबा महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून आणि डाँ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाचे निमित्ताने आयोजित तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा नुकताच वरप येथील सेक्रेट हार्ट शाळेत मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला, कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन  करण्यात आले होते,

यावेळी व्यासपिठावर जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पाताई पाटील, उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण व अर्थ समिती, सुभाष पवार, आ किसन कथोरे,महिला बालकल्याण सभापती रेश्मा मगर, झेडपी सदस्या जयश्री सासे, वृशाली शेवाळे, रमेश पाटील, कल्याण पंचायत समितीच्या सभापती अस्मिता जाधव, सदस्य रंजना देशमुख, दर्शना जाधव, रमेश बांगर, पांडूरंग म्हात्रे, यशवंत दळवी, रेश्मा भोईर, भारती टेंबे, गटविकास अधिकारी अशोक भवारी, गटशिक्षणाधिकारी डाँ रुपाली खोमणे व शिक्षणविस्तार अधिकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रारंभी प्रतिमा पूजन झाल्यावर जिपशाळा म्हसरोंडी च्या विद्यार्थांनी स्वागतगीत सादर केले, तथपूर्वी आमदार किसन कथोरे मधेच कार्यक्रमातून उठून निघून गेल्याने उपस्थितामध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली‌.

दरम्यान गटशिक्षणाधिकारी डाँ रुपाली खोमणे यांनी प्रास्ताविक केले, त्या म्हणाल्या, कल्याण तालुका भोगोलिक दृष्ट्या महत्वाचा आहे, जिप शाळेचा दर्जा उचावंत असून आजमितीस शाळेची विद्यार्थी संख्या १०  हजार २७१ इतकी आहे, शासनाच्या हरघरमे तिंरगा मध्ये खडवली केंद्रातून सुमारे ४ हजार मुलांनी सहभाग घेतला, तर १४२ शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याचे सांगितले, शिवाय आजचा शिक्षक पुरस्कार केवळ गुणवत्तूवर आधारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सांगितलेकी शिक्षकांनी संधीचा फायदा घेऊन मुलांना सहभागी  करुन त्यांना क्रियाशील शिक्षण द्यावे,यावेळी त्यांनी संत गाडगेबाबा,सानेगुरुजी यांची उदाहरणे दिली, शिक्षकानी झुंड निर्माण करण्यापेक्षा गुणवान व क्रियाशील विद्याथ्याची फौज निर्माण करावी असे अवाहन शिक्षकांना केले‌

तर झेडपी उपाध्यक्ष सुभाष पवार म्हणाले, शिक्षकांचे योगदान मोठे आहे, शिक्षकांचा आदर वाढला पाहिजे असे काम शिक्षकांनी करावे असे सांगून जिल्हात ७१० शिक्षकांची कमतरता आहे, जिल्हयातील पाचही तालुक्यात गटशिक्षणाधिकारी पदे भरली असल्याचे त्यांनी सांगितले, हा कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी खर्चाची तरतूद डब्बल केली आहे, असे बोलून स्पर्धा परीक्षेत कल्याण तालुक्याचे प्रतिनिधित्व नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली, शिवाय यापुढे कार्यक्रम वेळेवर सुरु करावा, अशा सूचना केल्या,यामुळे आमदार महोदय निघून गेल्याचे सांगितले.

यानंतर झेडपी अध्यक्षा पुष्षा पाटील, सभापती अस्मिता जाधव, झेडपी सदस्या जयश्री सासे, वृशाली शेवाळे आदींचीही भाषणे झाली.

यावेळी तालुका स्तरीय आदर्श पुरस्कार मिळालेल्या धनाजी गायकर (जिपशाळा), पावशेपाडा,) श्रीमती संध्या पवार (वडवली), सुनील तुपसौदर्य, (उशीद) सुनीता बेंडसे (कोंळिंब) संतोष भागवत (घोटसई) संजय होण्याळकर (सोनारपाडा) आणि शर्मिला गायकवाड (बामल्ली) या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, ट्राफी व प्रमाणपत्र देऊन गोरविण्यात आले.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन करताना  गटविकास अधिकारी  अशोक भवारी यांनी  मान्यवरांनी व्यक्त केलेली खंत व इतर चुका बद्दल  प्रशासनाचे  प्रमुख म्हणून दिलगिरी व्यक्त केली,
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, समग्रशिक्षा अभियान व शिक्षणविभाग कर्मचारी वृंद यांनी मेहणत घेतली.

Sunday, 27 November 2022

तब्बल ३६ वर्षांनी उघडली ऋणानुबंधाच्या आठवणींची शिदोरी, रायते येथील रायते विभाग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांंचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न !

तब्बल ३६ वर्षांनी उघडली ऋणानुबंधाच्या आठवणींची शिदोरी, रायते येथील रायते विभाग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांंचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न !

कल्याण (रायते), नारायण सुरोशी : कल्याण तालुक्यातील रायते येथील रायते विभाग हायस्कूल, रायते मधील  १९८६ साली दहावीतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन  रविवारी मोठ्या उत्साहात पार पडले.

गणपती व सरस्वतीचे पुजन करुन राष्ट्रगीताने या स्नेहसंमेलनाची सुरवात करण्यात आली. यावेळी आपल्यातून कायमचे निघून गेलेले शाळेतील काही शिक्षक, मित्र व कर्मचारी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आपली शाळा व आपल्याला घडविणारे शिक्षक यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

शाळेमध्ये आपण शिकत असताना वेगवेगळ्या मित्र मैत्रीणींजवळ आपले मैत्रीचे ऋणानूबंध जुळले यातील काही मित्र शालेय जिवनानंतर आपल्या नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने दूर गेले त्यांना एकत्र आणण्यासाठी या बॕचचे विद्यार्थी व विद्यार्थीनी पुढाकार घेऊन सदर स्नेहसंमेलनाचे प्रमिला रिसॉर्ट, भिसोळ येथे आयोजन केले.

१९८६ बॅचच्या विद्यार्थी व विद्यार्थीनी या स्नेह संमेलनाचे सुंदर आयोजन करुन तब्बल ३६ वर्षांनी आपल्या शालेय मित्र मैत्रिणींना एकत्र आणले. स्नेह भोजनानंतर प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील चांगले वाईट अनुभव एकमेकांजवळ व्यक्त करतानाच आपल्यातील कलागुणही सादर केले.

या स्नेहसंमेलनामुळे ३६ वर्षांनी शालेय मित्र मैत्रीणींची भेट होणार या ओढीने सर्व मित्र मैत्रिणी उपस्थित राहील्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

या स्नेहमिलनाची आठवण प्रत्येकाच्या हृदयात जपली जावी व ऋणानुबंध असाच कायम रहावा तसेच उपस्थित सर्व मित्र मैत्रिणींच्या एकत्र स्नेहसंमेलनाचे आयोजन करणाऱ्या टीमचं सर्वांनी कौतुक व आभार मानले व यापुढेही असेच सर्वजण गृपच्या माध्यमातून एकमेकांच्या कायम संपर्कात राहून प्रत्येकाच्या सुख दुःखात नेहमीच मदतीचा हात पूढे करु हा दृढनिश्चय करुन पुन्हा एकत्र येण्याचे ठरवून एकमेकांचा निरोप घेतला.

"मृदगंध" पुरस्कारांचे शानदार सोहळ्यात वितरण !

"मृदगंध" पुरस्कारांचे शानदार सोहळ्यात वितरण !

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लोकशाहिर विठ्ठल उमप यांनी आपल्या शाहिरीतून समाजात निर्माण केलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी निर्माण करू शकत नाही, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. १२व्या लोकशाहिर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाच्या वेळी मृदगंध पुरस्कार २०२२ चे वितरण करतांना ते बोलत होते. यावेळी अॅड. आशिष शेलार, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, पद्मभूषण उस्ताद राशीद खान, पराग लागू, नंदेश उमप मंचावर उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की,आज ज्यांना मृदगंध पुरस्कार दिला गेलाय त्या सर्व व्यक्ती कर्तृत्वाने हिमालयाएवढ्या मोठ्या आहेत. त्यांना पुरस्कार द्यायला मिळणे हाच माझ्याकरता एक मोठा पुरस्कार आहे. इथे या सर्व लोकांच्या मनोगतातून, गायनातून या कार्यक्रमाची उंचीही प्रचंड वाढली आहे. राजकारणात तीरस्कारालाही तोंड द्यावे लागते मात्र या मंचावर येऊन जो आनंद मिळाला तो अवर्णनीय आहे.

विठ्ठल उमप फाऊंडेशन तर्फे दरवर्षीप्रमाणे २६ नोव्हेंबर रोजी १२वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह तसेच २०२२ सालचे मृदगंध पुरस्कार रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य व वन मंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार त्यांच्या समवेत आमदार अॅड. आशिष शेलार, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.  

कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. २६/११ च्या कटू स्मृती आणि भारतीय संविधान दिनाच्या गोड आठवणी जाग्या करून संगीत समारोहाला सुरूवात झाली. मुंबईच्या कोकण कन्या बँडने अगदी अलवारपणे आपल्या सुरांची जादू संपूर्ण सभागृहात पसरली. बघता बघता सारे सभागृह त्यांच्या सुरांच्या तालावर लयबद्ध ठेका धरून गाऊ लागले. एकसंध तालासुरात ह्या कन्यांच्या  सप्तसुरांत सारे सभागृह रममाण झालेले असतानाच सांस्कृतिक कार्य व वन मंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार यांचे आगमन झाले आणि समीरा जोशी यांनी खास त्यांच्यासाठी छत्रपती शिवरायांच्या गीतांचं सादरीकरण करण्याची विनंती केली. आणि आहा त्यानंतर जो काही माहोल तयार झाला तो शब्दातीत होता. खुद्द मंत्री महोदयांनी देखील मनसोक्त दाद दिली.

त्यानंतर पारितोषिक वितरणाच्या मुख्य कार्यक्रमात श्री. फ. मु. शिंदे - जीवन गौरव, रवींद्र कोल्हे व स्मिता कोल्हे - सामाजिक क्षेत्र, संजय मोने व सुकन्या मोने - अभिनय क्षेत्र, रवींद साठे - संगीत क्षेत्र, श्रीमती कमलाबाई शिंदे - लोककला, श्रेया बुगडे - नवोन्मेष प्रतिभा यांना महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य व वन मंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार त्यांच्या समवेत आमदार अॅड. आशिष शेलार, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.  

सुप्रसिद्ध गायक पद्मभूषण उस्ताद राशीद खान हे यंदाच्या स्मृती संगीत समारोहाचे खास आकर्षण ठरले. प्रदीर्घ काळानंतर गायक आणि मुंबईचे रसिक प्रथमच सामोरे आले होते. आपली गायकी सादर करत असताना त्यांनी साथसंगत करत असलेल्या आपल्या सहकलाकारांनाही त्यांची गुणवत्ता दाखवण्याची संधी दिली. स्वतः गात असताना प्रेक्षकांना स्वतःसाेबत गाण्याची संधी त्यांनी दिली. स्मृती संगीत समारोहाच्या उत्तरार्धाची सांगता त्यांच्या 'आओ गे जब तुम साजना" ह्या गाण्याने होत असताना रसिकांचे डोळे, कान आणि मन तृप्त झाले होते.  
डॉ. समीरा गुजर जोशी यांनी सोहळ्याचे समयसूचक सूत्रसंचालन केले. सर्व पुरस्कार्थींच्या मानपत्रांचे वाचनही त्यांनी त्यांच्या खास पद्घतीने केले. त्यामुळे सभागृहात असलेल्या सर्वांसोबतच पुरस्कार्थीही दाद देत होते. या मानपत्रांचं सुंदर शब्दांकन आनंद खासबागदार यांनी केले.
आपल्या गायकीच्या कारकिर्दीची पन्नाशी गाठत असणार्‍या रवींद्र साठे यांनी "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे" हे गीत सादर केलं आणि सभागृहाने त्यांच्या सुरामध्ये आपला ताल मिसळला.  
विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आणि मृदगंध पुरस्कारास लागू बंधू यांनी सहकार्य केले. पुरस्काराचे शिस्तबद्घ आयोजन सुप्रसिद्ध गायक, शाहिर तसेच विठ्ठल उमप फाऊंडेशनचे सर्वेसर्वा नंदेश विठ्ठल उमप, सरिता नंदेश उमप आणि कुटुंबीय तसेच सहकार्‍यांनी अगदी लिलया केले.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संपन्नतेचे उदाहरण जगाला दिले जाईल – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संपन्नतेचे उदाहरण जगाला दिले जाईल – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्राला संपन्न असा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. या संपन्न अशा वारसाचे जतन आणि जोपासना करून येणाऱ्या काळात अख्ख्या जगामध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे  उदाहरण दिले जाईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्या दृकश्राव्य केंद्राचे “स्वरालय” दालनात आज उद्घाटन केले. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री वामन केंद्रे, दर्शनिका विभागाचे सचिव दिलीप बलसेकर, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्राला सांस्कृतिक वारसा आहेच. जेथे छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्याच महाराष्ट्रात महर्षी वाल्मिकी आणि भगवद्गीता पण आहे. शेक्सपिअर सर्वांना माहीत आहे पण कालिदासही याच भूमीतला आहे. एकूणच हीच महाराष्ट्राची ओळख आपल्याला जगभरात पोचवायची आहे. महाराष्ट्रात आर्थिक सुबत्ता आहे तशीच सांस्कृतिक सुबत्ता आहे. कारण आपल्याकडे असलेली कलेची माध्यमे आपले मन आनंदी ठेवण्याचे काम करतात. आपला हॅपिनेस इंडेक्स वाढविणाऱ्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सर्व प्रयत्न आपण करू. सांस्कृतिक वारशात महाराष्ट्राचा क्रमांक जगात पहिल्या दहात लागेल इतका समृद्ध वारसा आपल्याकडे आहे, असे ते म्हणाले.

माणसाच्या मनुष्यत्वाला उन्नत व परिपूर्ण करण्याचे कलेचे हे सामर्थ्य आणि त्याबाबतीत महाराष्ट्राचा विश्वविख्यात वारसा व आगळेपणा ध्यानात घेऊन ही कला जतन, संवर्धन व जोपासाण्यासाठी ध्वनिमुद्रित संगीत संग्रहालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्याच्या दृकश्राव्य कलेचा मोठा वारसा डिजीटल रूपात पुढच्या पिढीला मनोरंजनासोबत अभ्यासासाठीही या दृकश्राव्य केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

श्री. केंद्रे यावेळी म्हणाले की, रवींद्र नाट्य मंदिर येथील वास्तूचा इतक्या कलात्मक पद्धतीने वापर होणार आहे याचा आनंद वाटतो.

दृकश्राव्य दालनाविषयी :

रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे एका दृकश्राव्य दालनाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या दालनामध्ये नाट्य, चित्रपट, लोककला, शास्त्रीय संगीत याविषयीची दुर्मिळ सादरीकरण होणार आहेत. या अभिलेखांमध्ये कॅसेट, ध्वनिमुद्रिका, व्हिडिओ क्लिप्स, पुस्तके, फोटो, भाषणे इत्यादी दुर्मिळ बाबींचा समावेश आहे. हे दालन सर्वसामान्यांसाठी आजपासून (२६ नोव्हेंबर २०२२) खुले होत आहे.

कला ही निसर्गनिर्मित सृष्टीला अधिक रमणीय बनविणारी मानवनिर्मित प्रतिसृष्टी असते. ती मानवाच्या अस्तित्वाला अधिक सुंदर बनविते. त्याच्या अंतर्बाह्य जीवनसत्वाला आविष्कृत करते. माणसा-माणसाला प्रसन्नपणे जोडते आणि समग्र मानवी जीवनाला आनंदमय करते. कोणत्याही कलाक्षेत्रातील कामगिरी हा त्या समाजाच्या नवनिर्माण क्षमप्रज्ञेचा एक अत्यंत महत्त्वाचा मापदंड असतो.
ध्वनिमुद्रित संगीत संग्रहालयामध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित करण्यात आलेले शास्त्रीय संगीत कार्यक्रमाचे दुर्मिळ ध्वनीमुद्रण उपलब्ध आहे. तसेच चित्रपट महोत्सव, पुरस्कार सोहळे, लोककला महोत्सव, शिबिरे, परिसंवाद या कार्यक्रमांचेही जतन यामार्फत करण्यात आलेले आहे.

विविध ज्येष्ठ कलावंतांच्या मुलाखती जसे की, बाळ कुरतडकर, प्रभाकर जोग, मोहनदास सुखटणकर, सुलोचना लाटकर, भारुडरत्न निरंजन भाकरे, शाहीर देवानंद माळी, भरत कदम (गोंधळ, नृत्यांगना रेश्मा परितेकर, अरुण काकडे, भालचंद्र पेंढारकर, किशोरी आमोणकर, अप्पा वढावकर, प्रभा अत्रे, चित्तरंजन कोल्हटकर, आत्माराम भेंडे इ. मातब्बर कलावंतांच्या मुलाखती उपलब्ध आहेत. रानजाई, प्रतिभा आणि प्रतिमा, शब्दापलिकडले इ. मुलाखतींचे कार्यक्रमांचे ध्वनिचित्रमुद्रण दुरदर्शन यांच्याकडून उपलब्ध करुन घेण्यात आलेले आहे. श्री. के.टी.देशमुख यांनी संग्रहीत केलेल्या दुर्मिळ नाटकांचे, कलाकारांचे फोटोचे जतन करुन डिजिटल स्वरुपात ठेवण्यात आलेले आहेत. भालचंद्र पेंढारकर यांनी ध्वनिमुद्रित केलेल्या नाटकांचे ध्वनिमुद्रण स्वरालयमध्ये उपलब्ध आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने १९८५ साली संग्रहित केलेली संगीत व गद्य नाटकांचे ध्वनिचित्रमुद्रण स्वरालयात उपलब्ध आहे. उदा. संगीत मानापमान, संगीत जय जय गौरीशंकर, संगीत पुण्यप्रभाव, संगीत संशय कल्लोळ, संगीत पंडितराज जगन्नाथ, संगीत सुवर्णतुला, संगीत स्वयंवर, संगीत मदनाची मंजिरी, रायगडाला जेव्हा जाग येते (गद्य). महाराष्ट्रातील नऊ विद्यापिठांमार्फत करण्यात आलेल्या लोककला सर्वेक्षणाचे ध्वनिचित्रमुद्रण ‘स्वरालय‘ येथे उपलब्ध आहे.

कुणबी वधु-वर मेळाव्याचे चेंबूर येथे आयोजन !

कुणबी वधु-वर मेळाव्याचे चेंबूर येथे आयोजन !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर ) :
               कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई विभागीय शाखा चेंबूर संलग्न विवाह मंडळ यांच्यावतीने इच्छुक वधु-वर यांच्याकरिता रविवार दि.११ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३-३० वाजता आचार्य मराठे काॅलेज,चेंबूर (प.) मुंबई-४०० ०७१ येथे आयोजित केला आहे. इच्छुक वधू -वर /पालक यांनी मेळाव्यापूर्वी दररोज सायंकाळी ६ ते ८-३०या वेळेत कुणबी भवन, दुर्गादेवी मैदान, खारदेवनगर, घाटला,चेंबूर,मुंबई-७१ येथे श्री. प्रभाकर नागरेकर- मो- 9320246382 आणि शांताराम जाधव - मो.9969941429 यांच्याशी संपर्क ‌साधवा असे आवाहन शाखेच्यावतीने दत्ताराम शिवगण( सचिव- विवाह मंडळ चेंबूर) यांनी केले आहे.

'आजचा दिवस फक्त' (व्यसनमुक्तीची संघर्ष गाथा) या पुस्तकास पुरस्कार !

'आजचा दिवस फक्त' (व्यसनमुक्तीची संघर्ष गाथा) या पुस्तकास पुरस्कार !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर ) :

             मराठा मंदिर साहित्य शाखेच्या  वतीने नवोदित लेखकांसाठी प्रथम साहित्य लेखन पुस्तक प्रकाशन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातून अनेक नवोदित लेखकांनी आपली पुस्तके  स्पर्धेसाठी पाठवली होती. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मराठा मंदिर सभागृहात पार पडला. या सोहळ्यासाठी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि राज्यसभा खासदार पद्मश्री श्री कुमार केतकर उपस्थित होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री जयसिंगराव पवार यांचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात व्यसनमुक्तीचे विनामानधन कार्य करणारे रमेश सांगळे यांनी स्वतःच्या जीवनावर लिहिलेल्या 'आजचा दिवस फक्त'(व्यसनमुक्तीची संघर्ष गाथा) या पुस्तकास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका आणि  वृत्तपत्र लेखीका श्रीमती मंदाकिनी भट यांनी ही जबाबदारी पार पाडली.मराठा मंदिर साहित्य शाखेचे खजिनदार श्री संतोष घाग यांच्या हस्ते सांगळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.या पुरस्काराबाबत रमेश सांगळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मला माझी दिवंगत पत्नी नंदा हिच्याकडून मिळाली. हा पुरस्कार मी तिला सन्मानपूर्वक बहाल करीत आहे. तसेच आगामी काळात व्यसनांच्या संदर्भातच पुस्तक लिखाण करणार आहे.या सोहळ्यासाठी व्यासपीठावर पद्मश्री श्री.कुमार केतकर, श्री.जयसिंगराव पवार यांच्यासोबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे ॲड. शशिकांत पवार, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. विलासराव देशमुख, चिटणीस श्री. राजेंद्र गावडे उपस्थित होते.

ग्रामपंचायत वेळंब मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न !

ग्रामपंचायत वेळंब मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न !

*निवोश / गुहागर: उदय दणदणे*

देशात २६ नोव्हेंबर हा दिवस प्रत्येक नागरिकांसाठी फार महत्वाचा आहे. जगण्याचा खरा अधिकार राजमार्ग  प्राप्त झाला असा तो दिवस भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथांग प्रयत्नातून भारताचे संविधान लिहिले गेले व  २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत पारित केले गेले. धर्मनिरपेक्ष लोकशाही  व अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले तो  हा दिवस  संविधान दिन  म्हणून देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत वेळंब येथे संविधान दिनाप्रति भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर भारतीय संविधानाची शपथ घेण्यात आली व वेळंब बाजारपेठ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे स्तंभाला पुष्पहार अर्पण करून वेळंब बौद्धवाडी विहार येथे सर्व वाडीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला वेळंब ग्रामपंचायत सरपंच -समीक्षा बारगोडे , उपसरपंच- श्रीकांत मोरे, पोलीस पाटील - स्वप्नील बारगोडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !             कल्याण डोंबिवली महापाल...