Monday, 2 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे अस्थी कलश पूजन व सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन !!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे अस्थी कलश पूजन व सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन !!

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) ::
सर्वांचे प्रेरणास्थान,उत्तम प्रशासक, उत्तम राजकारणी, जनतेचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थीकलशाचे पूजन व श्रद्धांजली पर सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन बुधवार दिनांक ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी ठीक सकाळी ०९:३० ते ११:०० या वेळेत आनंदी हॉटेल कोटनाका उरण येथे करण्यात आले असून शोक सभे नंतर अस्थी विसर्जन माणकेश्वर मंदिर केगाव समुद्र किनाऱ्यावर करण्यात येणार आहे.तरी अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी व सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या शोकसभेस उपस्थित राहावे असे आवाहन उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांनी केले आहे

पडघा येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी !!

पडघा येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी !!

** समता, शिक्षण व सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

भिवंडी प्रतिनिधी, (मिलिंद जाधव) : 

भिवंडी तालुक्यातील साखरचौथ मित्र मंडळ, संत रोहिदास नगर, पडघा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४९ वी जयंती दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी संत रोहिदास नगर, पडघा येथे भक्तिभाव व उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाल अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संत रोहिदास महाराजांनी दिलेला समता, शिक्षण व सामाजिक न्यायाचा विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. संत रोहिदास महाराजांचे विचार व कार्य समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी राजेश्री राजेश जाधव यांच्या वतीने हळदी-कुंकू समारंभ तसेच पैठणी लक्की ड्रॉ कूपनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली. महिलांसाठी आयोजित पैठणी खेळाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या कार्यक्रमास माजी सरपंच अमोल बिडवी, रविंद्र विशे, शशांक तांबोळी, पराग पाटोळे, शैलेश बिडवी, माजी उपसरपंच दिपाली क्षिरसागर, पोलीस पाटील राजेश साळुंके, राजेश फकिरा जाधव, सामाजिक कार्यकर्ते चंदू जाधव, जयवंत वाळंज, पत्रकार मिलिंद जाधव, सामाजिक कार्यकर्ते कमलेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच सूरज भोईर, मोहित भोईर, अमोल जाधव, अनिकेत भोईर, ओंकार जाधव, संकेत जाधव, शुभम जाधव, दीपेश वाळंज, ऋषभ वाळंज, राहुल जाधव, जयेश जाधव, आकाश जाधव, मितेश जाधव, प्रतीक दळवी, अविनाश जाधव, संतोष जाधव, संतोष दळवी, नितेश जाधव, राज जाधव, यश जाधव, श्लोक जाधव यांच्यासह रोहिदास नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रोहिदास नगर, पडघा येथील तरुणांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत वाळंज यांनी केले.

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

** उरण मधील विविध सामाजिक संस्था संघटनानीं केली चिंता व्यक्त.

उरण दि २(, विठ्ठल ममताबादे) : भारतीय संस्कृतीत विवाह पवित्र संस्कार मानला जातो.लग्न म्हणजे दोन मनांचे पवित्र बंधन असायला हवे; लग्न म्हणजे दोन पवित्र आत्म्याचे मिलन.मात्र आज संपूर्ण महाराष्ट्रात लग्नाच्या नावाखाली हुंड्याच्या बोलीचा बाजार भरलेला दिसतो. जनावरांच्या बाजाराप्रमाणे मुलांची किंमत ठरवली जाते आणि मुलींचा अप्रत्यक्ष लिलाव केला जातो, ही बाब अत्यंत विदारक आणि समाजाच्या अपयशाचे द्योतक आहे. ‘हुंडा’ हा दोन अक्षरी शब्द आजही सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणवणाऱ्या समाजाला पोखरत आहे.हुंडा देणे किंवा घेणे हा कायद्याने गुन्हा असतानाही प्रत्यक्षात हा कायदा केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे. देशात एखादा टक्का विवाह वगळता उर्वरित बहुतेक विवाह हुंड्याच्या सर्रास देवाण-घेवाणीने होत आहेत. मात्र एवढ्या उघडपणे हा बेकायदा व्यवहार होत असूनही आजपर्यंत हुंडा दिला किंवा घेतल्याचा ठोस गुन्हा क्वचितच नोंदवला गेला आहे. आजवर एकही तथाकथित ‘हुंडापती’ तुरुंगात गेला नसल्याचे वास्तव चिंताजनक आहे.नोकरदार, डॉक्टर, अभियंते, प्राध्यापक आणि सरकारी कर्मचारी या तथाकथित उच्चशिक्षित वर्गातही हुंड्याचे दर वाढताना दिसतात. ‘मी माझ्या मुलीला हुंडा दिला, त्यामुळे माझ्या मुलासाठी हुंडा घेणारच’ हा जणू अलिखित नियमच समाजात रूढ झाला आहे. बदल स्वतःपासून सुरू करावा, असे सांगणारा समाज प्रत्यक्षात निर्णय घेण्याच्या वेळी मागे हटताना दिसतो.हुंड्याच्या मागण्या पूर्ण न झाल्यास नवविवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ केला जातो. सुरुवातीचे काही दिवस सगळं सुरळीत वाटतं; मात्र नंतर खरा छळ सुरू होतो. यातून अनेक महिलांना आत्महत्येस प्रवृत्त केलं जातं. आपण महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतो; मात्र हुंड्याच्या बाबतीत महाराष्ट्रही अपवाद नाही, हे विदारक वास्तव आहे.या बाबत उरण मधील विविध सामाजिक संस्था संघटनानी चिंता व्यक्त केली आहे.जागतिक बँकेच्या २०२१ मधील अभ्यासानुसार भारतात लग्नात वधूपक्ष वरपक्षापेक्षा सातपट अधिक खर्च करतो. १९६० ते २००८ या काळातील ४० हजार लग्नांच्या अभ्यासातून ९५ टक्के लग्नांत हुंडा दिला गेल्याचे स्पष्ट झाले आहे, जरी १९६१ पासून हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असला तरी.नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या ‘क्राइम इन महाराष्ट्र’ अहवालानुसार दर तासाला एक नववधू हुंडाबळी ठरते. दररोज पाच महिला हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या करतात, तर आठवड्याला किमान तीन महिलांच्या हत्येचा प्रयत्न होतो. धक्कादायक बाब म्हणजे, हुंडाबळी प्रकरणात ८६ टक्के आरोपी पुराव्याअभावी सुटतात आणि केवळ दोन टक्के प्रकरणांत शिक्षा होते. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही.या सगळ्या परिस्थितीत ‘स्त्री हीच स्त्रीची शत्रू आहे’ हे वास्तवही पुढे येते, कारण हुंडा प्रकरणात अटक झालेल्यांमध्ये २५ ते ३० टक्के महिला असतात. खोटी प्रतिष्ठा, सामाजिक दबाव आणि परंपरेच्या नावाखाली ही अमानवी प्रथा टिकून आहे. कर्जबाजारीपणा, गरिबी, हुंड्यामुळे खोळंबलेलं लग्न आणि समाजाच्या रूढी — या साऱ्यांचा बळी आज अनेक स्त्रिया ठरत आहेत ही एक घटना नसून समाजाचं आरसप्रतिबिंब आहे. या समस्येवर तोडगा काढण्याची क्षमता सामाजिक व राजकीय नेतृत्वाकडेच आहे. कायद्याची कडक अंमलबजावणी, हुंडाबळी प्रकरणात अजामीनपात्र गुन्ह्यांची तरतूद आणि आत्महत्येला सदोष मनुष्यवध मानण्यासारखे बदल काळाची गरज आहेत.

शेवटी, बदलाची सुरुवात समाजाने आणि विशेषतः तरुणींनी ठाम निर्णय घेऊनच करावी लागेल.हुंडा घेणाऱ्या किंवा अवास्तव मागण्या करणाऱ्या कुटुंबाशी लग्न न करण्याचा निर्णय घेतल्याशिवाय हे चित्र बदलणार नाही.त्यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे. मी हुंडा घेणार नाही व कोणाला घेऊ देणार नाही असा संकल्प आजच्या तरुणांनी केला व त्या प्रमाणे आचरण केल्यास हुंडा प्रथा नक्कीच बंद होईल यात संशय नाही

ट्रेलर खाली चिरडून चालकाचा मृत्यू !

ट्रेलर खाली चिरडून  चालकाचा मृत्यू !

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुतुम येथील IOTL कंपनी शेजारील ब्रीजवर जेएनपीटी ते पनवेलकडे जाणा-या लेनवर एका ट्रेलरच्या खाली चिरडून मजुराचा मृत्यू झाला.मृत्यू पावलेल्या मजुराचे नाव बृजभान मुन्डा यादव (३२) असून, तो मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील भीतरी येथील निवासी होता. तो उरण येथे ट्रेलर चालक म्हणून काम करत होता.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बृजभान यादव याने रात्री १ वाजण्याच्या सुमारास त्याच्या ताब्यातील ट्रेलर क्र. MH-46-BU-4299 हा धुतुम येथील IOTL शेजारील ब्रीजवर जेएनपीटी ते पनवेलकडे जाणा-या लेनवर उतारावर थांबवला होता. त्याने ट्रेलरचा हँन्डब्रेक न लावता ट्रेलरमधून खाली उतरून ट्रेलरच्या समोर गेला असता, ट्रेलर उतारावर असल्याने आणि त्यावर भरलेला कंटेनर असल्याने वजनामुळे ट्रेलर पुढे गेला आणि बृजभान यादव याच्या अंगावरून जाऊन तो गंभीर जखमी झाला.बृजभान यादव याला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटल मध्ये नेले असता त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. उरण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८५, १०६(१) (भा.द.वि कलम ३८३, १०४(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक संजय साबळे यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे

जासई मतदारसंघात महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा जल्लोष !!

जासई मतदारसंघात  महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा जल्लोष !!

** जासई जिल्हा परिषद गटातील उमेदवार डॉ.मनिष पाटील. पं.स.उमेदवार सौ.निर्मला नरेश घरत व सौ.प्रियंका दिपक मढवी यांचा विजय निश्चित - मनोहर भोईर

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, जासई जिल्हा परिषद गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. मनीष अनंत पाटील व जासई पंचायत समिती गणातील महाविकास आघाडीच्या उमेदवार निर्मला नरेश घरत यांचा जासई धुतुम, करळ, सोनारी, सावरखार, वेश्वी, चिर्ले, दिघोडे, विंधणे ग्रामपंचायतींच्या विविध गावांसह रानसई  ग्रामपंचायत आदिवासी वाड्या परिसरात प्रचाराचा झंझावात सुरू असून, घर टू घर जाऊन उमेदवार व कार्यकर्ते प्रचार पत्रकाचे वाटप करत आहेत. प्रत्येक गावागावात उमेदवारांचे जल्लोषात स्वागत होत आहे. मतदार संघातील मतदार हे जागृत मतदार आहेत. महाआघाडीला मत म्हणजे विकासाला मत त्यामुळे जासई  जिल्हा परिषद गटात व चिर्ले पंचायत समिती गणात महा विकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात निर्णायक आघाडी घेतली आहे. दरम्यान तालुक्यातील सोनारी, करळ, सावरखार, धुतुम, जासई सह अनेक गावांध्ये रविवारी या जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी उमेदवारांनी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी नागरिकांबरोबर संवाद साधून, हाताचा पंजा व खटारा चिन्हा समोरील बटन दाबून निवडून देण्याचे आवाहन केले. प्रचारात महिला, तरुण मंडळी, जेष्ठ कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. एक वेगळा उत्साह या निमित्ताने दिसून आला. प्रचारात डॉ.मनीष पाटील व निर्मला नरेश घरत व प्रियांका मढवी यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. यावेळी काँग्रेसचे महेंद्र घरत, शिवसेना माजी आमदार मनोहर भोईर, जासई विभाग अध्यक्ष विनोद पाटील, प्रेमनाथ ठाकूर, जासईचे सरपंच संतोष घरत, कंठवलीचे जयराम पाटील, भेंड भेंडखळचे  दिपक ठाकूर, रोहिदास पाटील, मेघश्याम कडू, दिनेश कडू, दिनेश पाटील, नारायण तांडेल ,किशोर कडू, रमाकांत कडू ,दत्ता कडू, कमलाकर पाटील, किशोर कडू, शेखर कडू, अविनाश कडू प्रवीण कडू ,सुनील कडू, विराज कडू, सूचित कडू, प्रमोद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद पाटील, तुकाराम कडू, अशोक कडू, दिनेश तांडेल,मुन्ना तांडेल केशव तांडेल,प्रकाश तांडेल,विश्वास तांडेल,प्रतीक कडू,भूषण कडू, संदीप तांडेल, दिनेश ठाकूर, विद्याधर ठाकूर नरेश तांडेल.डि.के.कडू, सुजाता कडू.शंकर तांडेल, मंगेश तांडेल, अंकुश तांडेल. यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाविकास आघाडीचे प्रेरणा पाटील,दिपक भोईर,परेश ठाकूर यांची प्रचारात आघाडी !!

महाविकास आघाडीचे प्रेरणा पाटील,दिपक भोईर,परेश ठाकूर यांची प्रचारात आघाडी !!

** जनतेचा मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद

** महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेचा भरभरून आशीर्वाद 

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या उमेदवारांतर्फे जोरात प्रचार सुरु असून महाविकास आघाडी तर्फे नवघर जिल्हा परिषद सदस्य पदासाठी प्रेरणा कुणाल पाटील (निशाणी मशाल), भेंडखळ पंचायत समिती सदस्य पदासाठी दिपक सुरेश भोईर (निशाणी मशाल) तर नवघर पंचायत समिती सदस्य पदासाठी परेश धनाजी ठाकूर (निशाणी मशाल) हे निवडणूक लढवीत आहेत. स्वच्छ, चारित्र्य संपन्न, विकासाभिमुख व जनतेच्या समस्यांची उत्तम जाण असलेले हे उमेदवार आहेत.उरण तालुक्यातील नवघर जिल्हा परिषद व भेंडखळ पंचायत समिती व नवघर गणात महाविकास आघाडीने सत्ता बदलाची घंटा जोरात वाजवली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उमेदवार प्रेरणा कुणाल पाटील आणि दीपक सुरेश भोईर, परेश ठाकूर यांनी रस्त्यावर उतरून केलेल्या आक्रमक, ज्वालाग्रही प्रचारामुळे संपूर्ण मतदारसंघ ढवळून निघाला असून विरोधकांची राजकीय जमीन अक्षरशः सरकताना दिसत आहे.

यावेळी जाहीर सभांच्या दिखाव्याला फाटा देत जनतेच्या दारात जाऊन थेट सवाल विचारणारा प्रचार प्रेरणा पाटील,दीपक भोईर,परेश ठाकूर यांनी राबवला आहे . विकास कोणाचा? स्वाभिमान कुणाचा? आणि लोकशाही कुणासाठी ? असे थेट प्रश्न जनतेसमोर ठेवत त्यांनी महाविकास आघाडीचा लढा हा सत्तेसाठी नव्हे, तर जनतेच्या हक्कासाठीचा संघर्ष असल्याचे ठामपणे मांडले.

या स्पष्ट भूमिकेला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत महाविकास आघाडीच्या बाजूने उघडपणे कौल दिल्याचे चित्र उभे राहिले आहे. उरण बालई व काळाधोंडा, बोकडविरा, कुंडेगाव, पागोटे परिसरात झालेल्या प्रचारात घोषणांनी आसमंत दणाणून गेला. हात जोडत, प्रश्न विचारत आणि रोखठोक बोलत मतदारांनी 'यावेळी बदल अटळ', 'खोट्यांना जागा नाही', असा स्पष्ट इशारा विरोधकांना दिला. प्रचारस्थळी दिसलेला जनसमुदाय पाहता विरोधकांचा आत्मविश्वास ढासळलेला असून त्यांची प्रचारयंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे, हे लपून राहिलेले नाही.या रणसंग्रामात महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श्री. शरदचंद्र पवार गट), शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे सर्वच नेते, पदाधिकारी,असंख्य निष्ठावंत कार्यकर्ते, महिला आघाडी आणि युवक मोठ्या संख्येने मैदानात उतरले आहेत. प्रचारात जनतेनी महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना भरभरून आशीर्वाद दिला असून  मोठया मताधिक्याने निवडून या असा आशीर्वाद दिला आहे.

Sunday, 1 February 2026

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

उल्हासनगर, राहुल उघडे :
टाऊन हॉल उल्हासनगर येथे शनिवारी (३१ जानेवारी)  गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूलचा पंधरावे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झाले. शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले होते.. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुखविंदर कौर एच् खैरा हे होते, तसेच संस्थेच्या सचिव हरप्रित सिंग खैरा, सदस्य उत्तम सिंग मानकू, गुरजिंदर कौर सिहरा, मनजित कौर तसेच प्रमुख पाहुणे प्रशांत पाटील, निलिमा म्हात्रे (सरपंच - मारळ), निलेश देशमुख, आतिश म्हात्रे, पवन जेशवानी हे उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त करत संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच कर्मचारी वर्ग, प्रमुख पाहुणे, विद्यार्थी, उपस्थित पालक यांनी दोन मिनिटे मौन पाळत मा. अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

या नंतर गणेश वंदना करत स्नेहसंमेलनला सुरुवात केली, यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक सुरेख नृत्य तसेच कार्यक्रम साजरे केले.  या स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थ्यांनीच अत्यंत आत्मविश्वासाने व प्रभावीपणे केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुखविंदर कौर एच् खैरा यांनी वार्षिक स्नेहसंमेलन हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे अशा विचाराने दरवर्षी असे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येते असे सांगितले, तसेच मान्यवर प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे रंगतदार सादरीकरण, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूलचे हे स्नेहसंमेलन अविस्मरणीय ठरले.





मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...