Friday, 30 October 2026

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

*स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना संधी द्यावी, या मागणीसाठी अजित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन*

*उरण, दि. २९ (विठ्ठल ममताबादे) :* उरण तालुक्यातील खोपटे येथील मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी व व्यवसायात सामावून घ्यावे, या मागणीसाठी गुरुवारी, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून गेट बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

दुपारी ११.३० वाजता कंपनीत स्थानिक बेरोजगार, प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि कंपनी प्रशासन यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे, शिवसेना नेते बी. एन. डाकी, भाजपा युवा नेते प्रशांत ठाकूर, पंचायत समिती सदस्या कविता रुपेश पाटील, कामगार नेते रवी घरत, मोठेखार (वरचा भाग) प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना, खोपटे-बांधपाडाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी १९ बेरोजगार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित कामावर रुजू करून घ्यावे, अशी आक्रमक मागणी मांडली.

यावेळी कंपनीचे अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित होते. प्रशासनाने सध्या १० जणांना कामावर घेतो, ३ महिन्यांनी उर्वरित ९ जणांना घेतो, असे आश्वासन दिले. मात्र हा निर्णय प्रकल्पग्रस्तांना मान्य झाला नाही. सर्व १९ जणांना एकाच वेळी कामावर घ्यावे, टप्प्याटप्प्याने नको, अशी ठाम भूमिका शिष्टमंडळाने घेतली. कंपनीने ही मागणी अमान्य केल्याने आंदोलक आक्रमक झाले.

मागण्या अमान्य झाल्याने कंपनीच्या गेटसमोरच बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

*स्थानिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप*

मेहर यार्ड कंपनीत पेण, अलिबाग, पनवेल तालुक्यातील ७० हून अधिक कामगार काम करत आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कंपनीसाठी संपादित झाल्या, त्यांनाच कामावर घेतले जात नसल्याचा आरोप शिवसेना नेते बी. एन. डाकी यांनी केला. स्थानिकांना प्राधान्य देण्याऐवजी परप्रांतीय आणि उरणबाहेरील लोकांची भरती सुरू असून, यामुळे स्थानिक तरुणांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल लेबर, सर्व्हेअर, हाऊसकीपिंगसह इतर कामांसाठी स्थानिक तरुणांना संधी द्यावी, अशी मागणी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अजित कृष्णा म्हात्रे यांनी केली. शासनाचा जीआर असतानाही कंपनी आणि ठेकेदार त्याचे उल्लंघन करत असून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली.

७/१२ धारक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीतील रोजगार आणि व्यवसायाच्या संधींमध्ये योग्य स्थान द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील यांनी केली.

मोठेखार (वरचा भाग) प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना, खोपटे-बांधपाडा यांच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

*यावेळी* भाजपा युवा नेते प्रशांत ठाकूर, शिवसेना नेते बी. एन. डाकी, पंचायत समिती सदस्य दीपक भोईर, कविता रुपेश पाटील, रवी घरत, मनसे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, सभापती राजेंद्र म्हात्रे, पोलीस पाटील रंगनाथ पाटील, माजी सरपंच विशाखा ठाकूर, प्रीती पाटील, अविनाश ठाकूर, भाजपा नेते किरण म्हात्रे, विश्वास पाटील, उद्योजक देवेंद्र पाटील, कुमार ठाकूर, बबन ठाकूर, संतोष पाटील आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...