Monday, 23 June 2025

वाडा तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची आमदार दौलत दरोडा यांची तातडीची सुचना !!

वाडा तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची आमदार दौलत दरोडा यांची तातडीची सुचना !!
वाडा, प्रतिनिधी : वाडा तालुक्यातील शहापूर विधानसभा मतदार संघात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांची सतत पडणाऱ्या पावसामुळे दुरावस्था झाली असून या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना आमदार तथा अनुसूचित जमाती समिती प्रमुख दौलतजी दरोडा यांनी सार्वजनिक बांधकाम ठाणे विभागाचे अधीक्षक अभियंता यांना केली आहे.

वाडा तालुक्यातील 
1. कोने - अघई रस्ता
2. देसई - तिलसा - सोनाळे - बेलवड रस्ता
3. वाडा - देवळी - मलवाडा - साखरा रस्ता
4. खैरे - वारनोळ - कोंढले रस्ता

या चार रस्त्यांची सतत पडणाऱ्या पावसामुळे अतिशय बिकट अवस्था झालेली असून येथील नागरिकांना व वाहनधारकांना वाहतुकीसाठी खूप गैरसोय होत आहे. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने  संदर्भात या चार रस्त्यांची आपण स्वतः व कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग जव्हार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वरील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. व तसा वस्तु स्थिती अहवाल सादर करावा, अशी सूचना आमदार दरोडा यांनी अधीक्षक अभियंता यांना केली आहे.

कोकण सुपुत्र राजेंद्र भुवड, मोहन कदम, लोकप्रिय शाहीर राजेश निकम, सचिन कदम, शाहीर राजु धावडे यांचा राज्यस्तरीय "कोकण दीप" पुरस्काराने गौरव !!

कोकणदीप मासिकाचा २३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा !!

** कोकण सुपुत्र राजेंद्र भुवड, मोहन कदम, लोकप्रिय शाहीर राजेश निकम, सचिन कदम, शाहीर राजु धावडे यांचा राज्यस्तरीय "कोकण दीप" पुरस्काराने गौरव 

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

कोकणदीप मासिकाचा २३ वा वर्धापन दिन मुबंई मराठी ग्रंथ संग्रालय दादर येथे मा.ना.श्री योगेशदादा कदम (राज्यमंत्री गृह (शहरे) यांच्या उपस्थितीत मोठया थाटामाटात संपन्न झाला.यावेळी सामाजिक शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना कोकणदीप  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच श्री. शशिकांत सावंत(पत्रकार, साहित्यिक), श्री.रविंद्रभाई कालेकर (सदस्य महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ) यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी मंचावर श्री.सुधीरभाऊ कदम (शिवसेना संपर्क प्रमुख -दापोली विधानसभा) ,डॉ.सुकृत खांडेकर (जेष्ठ पत्रकार, संपादक दैनिक प्रहार), श्री संतोष परब (महाराष्ट्र शासन समाज भूषण पुरस्कार प्राप्त), डॉ.राम मेस्त्री (साहित्यिक), श्री.प्रवीण घाग (गिरणी कामगार नेते), श्री रणजित जाधव, विनय शेडगे आदी मान्यवर  उपस्थित होते. 

या कार्यक्रमात कोकण सुपुत्र राजेंद्र भुवड, मोहन कदम लोकप्रिय शाहीर राजेश निकम, सचिन कदम, शाहीर राजु धावडे यांना मा.ना.श्री योगेशदादा कदम (राज्यमंत्री गृह (शहरे)) यांच्या शुभ हस्ते सन्मान पत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून मोहन जयराम कदम जमेल तशी जनसेवा करत आहेत. गावांमध्ये विकासात्मक गोष्टींना चालना देणे, आजारी व्यक्तीला उपचारासाठी योग्य  मार्ग दाखवणे, विद्यार्थी वर्गाला मदत करणे आदी कामात सदैव तप्तर असलेले कदम, राजेंद्र भुवड तसेच कोकणची लोककला शक्ती-तुरा या कलेतून गाण्यांच्या माध्यमातून विविध विषयावर गाणी तयार करून जनजागृती करणारे लोकप्रिय शाहीर राजेश निकम, सचिन कदम, शाहीर राजु धावडे यांना राज्यस्तरीय "कोकण दीप पुरस्कार-२०२५ देऊन गौरव झाल्याबद्दल अनेकांनी त्यांना यानिमित्ताने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्याधर शेडगे, सागर शेडगे, संदीप शेडगे, नितीन सुकदरे, निशांत शेडगे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रसाद महाडिक यांनी केले. तर आभार प्रदर्शन संपादक श्री.दिलीप शेडगे यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.

उरण ते ठाणे, उरण ते सीएसएमटी, उरण ते पनवेल थेट ट्रेन सुरु करून ट्रेनच्या फेऱ्या वाढविण्याची शिवसेना, युवासेनेची मागणी !!

उरण ते ठाणे, उरण ते सीएसएमटी, उरण ते पनवेल थेट ट्रेन सुरु करून ट्रेनच्या फेऱ्या वाढविण्याची शिवसेना, युवासेनेची मागणी !!

उरण, दि २३, (विठ्ठल ममताबादे) :
उरणला रेल्वे आल्यापासून अनेक नागरिक दळणवळणा साठी रेल्वेचा मोठया प्रमाणात वापर करू लागले आहेत. सर्वात सुरक्षित विश्वसनीय व आरामदायी कमी खर्चाचा व कमी वेळेत योग्य स्थळी पोहोचण्याचा उत्तम सुविधा म्हणून नागरिक रेल्वे सेवेकडे पाहत आहेत.मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या उरण ते बेलापूर, उरण ते नेरुळ या मार्गावर रेल्वेच्या फेऱ्या कमी व वेळेत नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर अत्यंत कमी फेऱ्या आहेत. या मार्गावर जास्तीत जास्त फेऱ्या वाढवाव्यात व ठाणे, सीएसएमटी, पनवेल या ठिकाणी थेट रेल्वे सेवा सुरु करून या ट्रेनच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व युवा सेनेच्या वतीने पत्रव्यवहार करून करण्यात आली आहे.

सिडकोने द्रोणागिरी शहर लोकवस्तीसाठी तसेच मालाची आयात निर्यात करण्यासाठी वखारी, कंटेनर फ्रेंट स्टेशन बसविले आहेत. मुंबईला पर्याय म्हणून सिडको शहर बसविले आहे. द्रोणागिरी शहरा पासून मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे महानगरपालिका तसेच मुंबई- पूणे हायवे तसेच मुंबई- कोकण-गोवा हायवे जाडलेले आहे. द्रोणागिरी शहरा शेजारी न्हवा शेवा बंदर हे (जेएनपीए) ७५ लाख कंटेनर हाताळणारे भारतातील नंबर १ बंदर आहे. आणि येथे जे.एन.पी.ए चे विशेष आर्थिक क्षेत्र सेझ आहे. तसेच येथे ओएनजीसी, एमएसईबी बीपीसीएल, आयओटीएल, आयओसीएल, एमआयडीसी, रिलायन्स, कस्टम हाऊस, जेएनपीए टाऊनशीप येथे बसविले आहे. येथे असलेल्या असंख्य कंपन्यांमुळे येथे लाखो कामगार (माथाडी ड्रायवर, सीएचए इत्यादी) काम करत आहे. या सर्व सामान्य व मध्यवर्गीय लोकांना स्वस्त व वेळेत कार्यालयात पोहोचविणारे विश्वसनीय प्रवासाचे साधन म्हणजे लोकल ट्रेन ला पथम प्रसंती दिली जाते. येथे न्हावा शेवा बंदर स्थापन होऊन ३५ वर्षे झाली. ३५ वर्षा नंतर ट्रेन व अटल सेतू सुरू झाला आहे. जर प्रवासाची साधने योग्य वेळीच सुरू झाली असती तर द्रोणागिरी शहराची भरभराट झाली असती. असा सर्व उरणचा इतिहास व भूगोल असताना मध्य रेल्वेने द्रोणागिरीच्या विकासासाठी हातभार लावण्यासाठी उरण ते सीएसएमटी व उरण ते पनवेल व उरण ते ठाणे ट्रेन सूरू करून लोकलच्या फेऱ्यामध्ये वाढ करावी. सध्या स्थितीत उरण ते नेरूल व उरण ते बेलापूर लोकल सूरू आहे. परंतू मुंबई व पनवेल हे ट्रेन नसल्यामुळे चाकरमान्यांना नेरूल व बेलापूरला उतरून पुढील ट्रेन पकडावी लागते. सदर ट्रेन मध्ये खूप गर्दी असल्यामुळे दाटी वाटीने उभ्याने प्रवास करावा लागतो. प्रवासात दमछाक झाल्याने कामावर परिणाम होत आहे. प्रवाशांच्या शारिरीक वा मानसिक त्रास कमी करण्यासाठी व सुरक्षित प्रवासाठी मध्य रेल्वेने उरण ते मुंबई व उरण ते पनवेल व उरण ते ठाणे अश्या ट्रेन सुरू करून पॅसेंजर ट्रेनच्या फेऱ्या वाढवून तमाम द्रोणागिरी वाशियांना, चाकरमान्यांना आणि उरणच्या प्रवाश्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पत्रव्यवहारच्या माध्यमातून शिवसेना द्रोणागिरी शहर शाखा प्रमुख जगजीवन भोईर, युवासेना उरण तालुका अधिकारी करण हरिश्चंद्र पाटील तसेच विभागप्रमुख रुपेश पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सतत पाठपुरावा सुरु ठेवणार असल्याचे शिवसेना द्रोणागिरी शहर शाखा प्रमुख जगजीवन भोईर, युवासेना उरण तालुका अधिकारी करण हरिश्चंद्र पाटील तसेच विभागप्रमुख  रुपेश पाटील यांनी सांगितले.

"कला भूमीपुत्रांची" माध्यमातून आगरी कोळी कराडी संस्कृतीची लोकगीते, कोळीगीते रसिक प्रेक्षकांच्या भेटीला‌ !!

"कला भूमीपुत्रांची" माध्यमातून आगरी कोळी कराडी संस्कृतीची लोकगीते, कोळीगीते रसिक प्रेक्षकांच्या भेटीला‌ !!

उरण, दि २३, (विठ्ठल ममताबादे) : आगरी कोळी कराडी समाजातील कुंडेवहाळ गावातील कलाकार अमन कैलास वास्कर आयोजित वारसा संस्कृती आगरी कोळी कराडी कलेचा (कला भूमिपुत्रांची) पारंपरिक लोकगीते कोळीगीते आणि हास्य विनोदांचा बहारदार नजराणा आता सर्वांना अनुभवता येणार आहे. आगरी कोळी कराडी समाजातील बरेच कलाकार आजपर्यंत यूट्यूब आणि टीव्ही सिरीयलच्या माध्यमातून बघत होते. पण आज हे सर्व भूमिपुत्र कलाकार एकत्र येऊन आपली कला थेट प्रेक्षकांपर्यंत पोहचवून रसिक प्रेक्षकांचे लाइव्ह मनोरंजन करण्यासाठी येत्या बुधवारी २५ जून २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे येणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून सर्व कलाकारांना प्रोत्साहिक करण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा निर्माते अमन ज्योती कैलास वास्कर (कुंडेवहाळ) यांनी आग्रहाची विनंती केली असून आगरी कोळी कराडी समाजात प्रथमच सर्व कलाकार एकत्र येऊन कला भूमिपुत्रांची या कार्यक्रमाचा शुभारंभ चा प्रयोग आनंदाने पार पाडणार आहेत. सदर कार्यक्रमात  उरण पनवेल रायगड मधील सर्व भूमिपुत्र कलाकार उपस्थित राहणार आहेत.

Sunday, 22 June 2025

पत्रकार भीमराव धुळप यांची यशवंतराव चव्हाण पुरस्कारासाठी निवड !!

पत्रकार भीमराव धुळप यांची यशवंतराव चव्हाण पुरस्कारासाठी निवड !!

 मुंबई, (शांताराम गुडेकर) :

            सामाजिक बांधिलकी असलेले धगधगती मुंबई वृत्तपत्राचे संपादक आणि महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पत्रकार श्री. भीमराव धुळप यांना यशवंतराव चव्हाण फाउंडेशनतर्फे पत्रकारिता आणि समाजसेवेसाठी दिला जाणारा सन २०२५ चा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष संजय सावंत यांनी नुकतीच या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
            हा पुरस्कार १५ ऑगस्ट २०२५ रोजी नवी मुंबई येथे होणाऱ्या भव्य समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.भीमराव धुळप यांनी गेल्या दोन दशकांपासून विविध सामाजिक, आरोग्यविषयक, आणि शैक्षणिक विषयांवर लेखन आणि जनजागृती केली असून, "धगधगती मुंबई" या लोकप्रिय वाचकप्रिय वर्तमानपत्राचे संपादन करताना त्यांनी असंख्य सामान्य माणसांच्या समस्या प्रकाशझोतात आणल्या आहेत. त्यांना याआधी २०१६ साली युवा संघर्ष प्रतिष्ठान, गुढे पाचगणी (शिराळा) यांच्या वतीने पहिला पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ते आतापर्यंत  २१ राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. यामध्ये विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव केला आहे. अलीकडेच त्यांना संत रोहिदास मित्र मंडळ, घोगाव या त्यांच्या जन्मगावी समाजाच्या वतीने समाजभिमुख कार्यासाठी विशेष पुरस्कार देण्यात आला होता.
              २०२५ सालातील हा त्यांचा दुसरा पुरस्कार ठरतो आहे.यशवंतराव चव्हाण फाउंडेशन ही संस्था मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागात आपल्या उल्लेखनीय कार्यामुळे प्रसिद्ध आहे. संस्थेने त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान बहाल केला आहे.या पुरस्कारामुळे पत्रकार भीमराव धुळप यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, विविध पत्रकार संघटना, सामाजिक संस्था आणि साहित्यिक क्षेत्रातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कुणबी युवा मंडळाच्या अध्यक्ष पदी गुहागर चे युवराज (संतोष) कांबळे, सरचिटणीस पदी संगमेश्वर चे सचिन रामाने तर खजिनदार पदी रोह्याचे पांडुरंग दोडेकर यांची निवड !!

कुणबी युवा मंडळाच्या अध्यक्ष पदी गुहागर चे युवराज (संतोष) कांबळे, सरचिटणीस पदी संगमेश्वर चे सचिन रामाने तर खजिनदार पदी रोह्याचे पांडुरंग दोडेकर यांची निवड !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

           कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई सलग्न कुणबी युवा मंडळ यांची सन २०२४ ते २०२९ या कालावधीसाठी नवीन कार्यकारणी व पदाधिकारी निवड रविवार दि.२२ जून २०२५ रोजी, सकाळी १०.३० वाजता, कुणबी ज्ञाती गृह, (वाघे हॉल) परेल मुंबई येथे संघाध्यक्ष अनिल नवगणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला सरचिटणीस कृष्णा वणे यांनी सुरुवात करून निवड प्रक्रिया बाबत माहिती दिली. १०५ वर्ष जुनी असलेली मातृसंस्था आणि तिचा इतिहास, संघाचे ध्येय धोरणे, कामकाज, हक्क अधिकाराची चळवळ याची उपस्थित युवा प्रतिनिधीना माहिती दिली. यावेळी संघ पदाधिकारी उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर, बबन उंडरे, उदय कठे, एड. अवधूत तोरस्कर तसेच संघ सहसचिव माधव कांबळे, प्रमोद खेराडे, रवींद्र कुडतडकर, संजय उमासरे, खजिनदार महेश शिर्के उपस्थित होते. कोकण विभागात कुणबी संघाच्या ४२ पेक्षा जास्त तालुका शाखा आहेत. या शाखांमधून युवा प्रतिनिधी उपस्थित राहून हि निवड प्रक्रिया पार पडली.

          यामध्ये कुणबी युवा मंडळ कार्यकारिणी सन 2024-25 ते 2029 पुढील प्रमाणे निवडण्यात आली. अध्यक्ष : युवराज (संतोष) कांबळे (गुहागर), उपाध्यक्ष : मिलिंद चिबडे (महाड पोलादपूर), उपाध्यक्ष : प्रतिक मिसाळ (खेड), उपाध्यक्ष : एड. महेश आंबवले (तळा), उपाध्यक्ष :पुनित खांडेकर (ठाणे शहर), सरचिटणीस : सचिन रामाणे (संगमेश्वर), सहचिटणीस : पंकज पालकर (माणगाव), सहचिटणीस : नितिन भुवड (मुरुड-जंजिरा), सहचिटणीस : अविनाश आग्रे (लांजा), सहचिटणीस : बारकू बेडल (चिपळूण), खजिनदार : पांडुरंग दोडेकर (रोहा) यांची निवड झाली. सर्व नवनिर्वाचित मध्यवर्ती कुणबी युवा पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य यांचे हार्दिक मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मृणाली आग्रेंची यशाला गवसणी.....

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मृणाली आग्रेंची यशाला गवसणी.....

नालासोपारातील ता, २२ :- वसई तालुक्यातील नालासोपारा येथे राहणारी मृणाली दिपक आग्रे हिने एल.एल.बी पदवी घेत आपले यश संपादन करत वकिली शिक्षणात बाजी मारली.
शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक व विभाग प्रमुख निलेश शिंदे यांनी भेट घेत शुभेच्छा देत कौतुक केले.
परिस्थितीवर मात करून वकील होणे, म्हणजे अनेक आव्हानांवर मात करून कायद्याच्या क्षेत्रात यशस्वी होणे. यासाठी कठोर मेहनत, समर्पण आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. 

कु. मृणाली आग्रे हिने आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण घेतले असुन आपल्या जिद्द आणि चिकाटीने एल.एल.बी. यशस्वीपणे कुठल्याही प्रकारे क्लास न लावता अथक परिश्रमाने यश संपादन केले.

केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !

केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !             कल्याण डों...