Saturday, 23 August 2025

भुलाबाई महोत्सव २०२५ : जळगाव जिल्ह्यातील ७ तालुक्यांमध्ये तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन‌ !!

भुलाबाई महोत्सव २०२५ : जळगाव जिल्ह्यातील ७ तालुक्यांमध्ये तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन‌ !!

*हजारो महिला व तरुणींच्या सहभागातून लोकपरंपरेचा उत्सव जिल्हाभर साजरा होणार*

जळगाव : केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनी तर्फे दरवर्षी भव्य स्वरूपात होणारा भुलाबाई महोत्सव यंदा २४ व्या वर्षात पदार्पण करत असून, २०२५ मध्ये अधिक व्यापक रूपात साजरा होत आहे.

प्रथमच या महोत्सवाची तालुकास्तरीय पातळीवर विस्तृत आखणी करण्यात आली असून ७ तालुक्यांमध्ये प्राथमिक फेरी होणार आहे. जिल्हाभरातील अंदाजे १० हजार महिला व मुली या सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी होऊन लोकसंस्कृतीचे दर्शन घडवतील.

भुलाबाई ही महाराष्ट्रातील पारंपरिक लोकपरंपरेतील महत्त्वाची लोकदेवता असून, महिलांमध्ये सामाजिक ऐक्य, कला आणि भक्तीभाव जागवणारी ही परंपरा आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी आणि लोकपरंपरेतील भुलाबाई गीतांचा प्रसार व्हावा, हा महोत्सवाच्या आयोजनामागील प्रमुख हेतू आहे. या उत्सवाच्या माध्यमातून महिलांना आपली गाणी, नृत्य, पारंपरिक खेळ, वेशभूषा आणि सादरीकरण सादर करण्याची संधी मिळते.

“महिला सबलीकरण आणि लोकपरंपरेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे,” असे केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.

महिलांच्या आत्मीयतेचा आणि लोकपरंपरेचा उत्सव असलेल्या या महोत्सवात विजेत्या संघांना पारितोषिके व सहभागींना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. तसेच महोत्सवाच्या निमित्ताने भुलाबाईची पालखी सोहळाही काढण्यात येणार आहे.

या तालुकास्तरीय स्पर्धांमधील विजेत्या संघांना जिल्हास्तरीय महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी भैय्यासाहेब गंधे सभागृह, ला. ना. शाळा, जळगाव येथे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत होणार असून, कान्हदेशातील सर्वात मोठा सांस्कृतिक सोहळा म्हणून भुलाबाई महोत्सवाची ख्याती आहे.

स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटात होणार असून प्रत्येक गटात १२-१५ मुली सहभागी होतील. भुलाबाईच्या गाण्यांसोबतच चालू घडामोडींवरील समाजोपयोगी संदेश असलेल्या सादरीकरणांना प्राधान्य दिले जाईल. विजेत्या संघांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे तसेच सर्व सहभागींना प्रमाणपत्र दिले जाईल. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक मुलगी व महिलेला आयोजकांतर्फे भुलाबाईचा खाऊ (प्रसाद) प्रत्येक सहभागीला देण्यात येईल.

*तालुकास्तरीय महोत्सवाचे वेळापत्रक*

२४ ऑगस्ट – चाळीसगाव : रंगगंध कला सक्त न्यास यांच्या सहयोगाने बॉबी मेहता हॉल, आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज
३ सप्टेंबर – सावदा : गोदावरी फाउंडेशन यांच्या सहयोगाने डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, सावदा
५ सप्टेंबर – जामनेर : गिरीश महाजन फाउंडेशन यांच्या सहयोगाने बाबाची राघू मंगल कार्यालय, जामनेर 
७ सप्टेंबर – पाचोरा : अखिल भारतीय ब्राह्मण समाज महिला संघ यांच्या सहयोगाने भक्तीधाम, पाचोरा
८ सप्टेंबर – चोपडा : भगिनी मंडळ यांच्या सहयोगाने भगिनी मंडळ सभागृह, चोपडा
८ सप्टेंबर – भुसावळ : प्रतिष्ठा महिला मंडळ यांच्या सहयोगाने संतोषी माता हॉल, भुसावळ 
९ सप्टेंबर – भडगाव : माजी आमदार दिलीपभाऊ वाघ युवा फौंडेशन यांच्या सहयोगाने लक्ष्मण बापू मंगल कार्यालय, भडगाव 

**“भुलाबाई महोत्सव हा केवळ सांस्कृतिक सोहळा नसून महिला सबलीकरण, लोकसंस्कृती संवर्धन आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव आहे. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या महोत्सवाला यशस्वी करावे,” असे आवाहन केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

सौजन्य/प्रसिद्धी - सागर येवले (+91 90041 84333)

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...