माहुलीगडावर पेटलेली स्वराज्याची मशाल भोकरीत पोहोचली !
** शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमी युवकांचा प्रेरणादायी पराक्रम
खडावली प्रतिनिधी प्रकाश राऊत: ता . १९, मौजे भोकरी, ता. भिवंडी, जि. ठाणे –
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भोकरी गावातील शिवप्रेमी युवकांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून एक ऐतिहासिक, प्रेरणादायी व समाजप्रबोधनात्मक उपक्रम साकार केला. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या माहुलीगडावर मशाल प्रज्वलित करून ती भोकरी गावापर्यंत वाजत-गाजत, शिवघोष करत आणण्यात आली. या मशाल यात्रेमुळे संपूर्ण परिसरात शिवभक्तीचे व राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले.
स्वप्निल गोरले, नरेश गोरले, रोशन गोरले व रवी कातकरी या चार तरुण शिवप्रेमींनी माहुलीगडावरून मशाल पेटवून ती आपल्या गावापर्यंत आणण्याची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. “जय भवानी, जय शिवाजी”, “हर हर महादेव” अशा गगनभेदी घोषणांतून संपूर्ण प्रवास पार पडला. या मशाल यात्रेने शिवरायांचे विचार, त्यांचा पराक्रम व स्वराज्याची प्रेरणा प्रत्येकाच्या मनात पुन्हा जागवली.
भोकरी गावात मशाल आगमनानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी शिवभक्तीने भारावून जात हा उत्सव साजरा केला. संपूर्ण गाव शिवमय झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योद्धा नव्हते, तर ते आदर्श राजा, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी शासक आणि धर्मरक्षक होते. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद, राष्ट्रप्रेम, शिस्त, चारित्र्य व पराक्रम ही मूल्ये त्यांनी समाजाला दिली. त्यांच्या विचारांतून आजच्या युवकांना स्फूर्ती मिळून राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा मिळते.
भोकरी गावातील शिवप्रेमी युवक गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने असे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत असून समाजात राष्ट्रभक्ती, ऐक्य व संस्कारांची जाणीव निर्माण करत आहेत.माहुलीगडावरून मशाल आणण्याचा हा उपक्रम म्हणजे स्वराज्याच्या विचारांची ज्योत प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.
या प्रेरणादायी उपक्रमाबद्दल ग्रामस्थांकडून स्वप्निल गोरले, नरेश गोरले, रोशन गोरले व रवी कातकरी यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण गावात नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment