Sunday, 8 March 2026

विकास आणि एकतेची नवी ओळख : नळेफोडी गावाला ‘स्वप्नातील गाव’ पुरस्कार !

विकास आणि एकतेची नवी ओळख : नळेफोडी गावाला ‘स्वप्नातील गाव’ पुरस्कार !

मुंबई (शांताराम गुडेकर /दीपक मांडवकर) :
                 रायगड किल्ल्यापासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले नळेफोडी गाव आपल्या एकजुटीमुळे आणि विकासकामांमुळे विशेष ओळख निर्माण करत आहे. गावातील श्री विघ्नहर्ता मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे मंदिर म्हणून त्याची ख्याती आहे.
                गावाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामस्थांमधील दृढ एकता. कोणत्याही राजकीय मतभेदांना दूर ठेवत सर्व ग्रामस्थ एकत्रितपणे गावाच्या प्रगतीसाठी कार्य करत आहेत. सर्वानुमते निर्णय घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
                गावातील ज्येष्ठ मंडळी श्री वामन महादे श्री.चंद्रकांत महादे, श्री.लक्ष्मण महादे तसेच गावचे उपसरपंच श्री. नथुराम चाचले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ यांच्या सहकार्याने विविध विकासकामे करण्यात आली आहेत. बसथांब्यापासून शाळेपर्यंत रस्त्यालगत प्रकाश व्यवस्था, सौरऊर्जा प्रकल्प, गावाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, ऑनलाईन सुविधांसाठी मोफत वाय-फाय, तसेच पाण्यासाठी विहीर आणि धरण बांधकाम अशी अनेक कामे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहेत.
                 गाव आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना ग्रामस्थांनी स्वकष्टाने अनेक उपक्रम राबवून विकासाचा आदर्श निर्माण केला आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत स्वदेश फाउंडेशनच्या वतीने नळेफोडी गावाला ‘स्वप्नातील गाव’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या सन्मानामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून भविष्यातही गावाच्या प्रगतीसाठी अशाच उपक्रमांना गती देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

ईगल फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे महिला गौरव सोहळा संपन्न !!

ईगल फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे महिला गौरव सोहळा संपन्न !! ** ईगल फौंडेशनचे सन 2026 चे राज्यस...