Monday, 1 June 2026

खासगी धाब्यांवर एसटी गाड्या थांबवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत - - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

खासगी धाब्यांवर एसटी गाड्या थांबवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत -  - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक


रत्नागिरी, प्रतिनिधी : खासगी धाब्यांवर एसटी गाड्या थांबवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

श्री. सरनाईक यांनी ३० मे पासून रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्याला सुरुवात केली. शनिवारी संध्याकाळी त्यांनी संगमेश्वर येथील नव्या एसटी बसस्थानकाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी बसस्थानकातील अंतर्गत व्यवस्था आणि प्रवासी सुविधांचा थेट आढावा घेतला.

रात्री धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी गाड्यांना अधिकृत स्थानकांवरील उपाहारगृहात थांबवणे बंधनकारक असतानाही काही चालक-वाहक खासगी धाब्यांवर गाड्या थांबवतात, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर मंत्री सरनाईक यांनी अशा मनमानीला आळा घालण्यासाठी राज्य पातळीवरून विशेष मोहीम हाती घेतली जाईल, असे सांगितले. खासगी धाबाचालकांशी संधान साधून प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

बसस्थानक पाहणी दरम्यान मंत्र्यांनी परिसर, प्रसाधनगृह, हिरकणी कक्ष आणि कर्मचारी निवासस्थानांची बारकाईने पाहणी केली. चकाचक व्यवस्था आणि स्वच्छता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. हिरकणी कक्षात २४ तास वीज, पाणी आणि सुरक्षा राखण्याच्या तसेच दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना दिल्या.

उपाहारगृहात जाऊन त्यांनी स्वयंपाकघराची पाहणी केली आणि स्वतः वडापावचा आस्वाद घेतला. व्हीआयपी संस्कृती बाजूला सारत त्यांनी बिलाचे पैसे स्वतः रोखीत दिले.

दरम्यान, संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. याची गंभीर दखल घेत मंत्र्यांनी तत्काळ शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे आदेश एसटी अधिकाऱ्यांना दिले.

No comments:

Post a Comment

🇮🇳 *हिंदी दिवस व ६ वे अखिल भारतीय राजभाषा संमेलनात नागरी संरक्षण दलाची उल्लेखनीय कामगिरी* !!!

🇮🇳 *हिंदी दिवस व ६ वे अखिल भारतीय राजभाषा संमेलनात नागरी संरक्षण दलाची उल्लेखनीय कामगिरी* !!! नवी मुंबई, वाशी : केंद्र शासन गृ...