Tuesday, 2 June 2026

उरण-पनवेल मुख्य रोडवर मृत्यूचा सापळा; तेलीपाडा आणि नवीन शेवा येथील गतिरोधकांबाजूच्या खड्ड्यांमुळे अपघाताची दाट शक्यता !!

उरण-पनवेल मुख्य रोडवर मृत्यूचा सापळा; तेलीपाडा आणि नवीन शेवा येथील गतिरोधकांबाजूच्या खड्ड्यांमुळे अपघाताची दाट शक्यता !!

उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) :
उरण-पनवेल या मुख्य रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी तेलीपाडा आणि नवीन शेवा गावच्या हद्दीतील गतिरोधक गेल्या कित्येक महिन्यांपासून अत्यंत धोकादायक बनले आहेत. या मुख्य रस्त्यावरील गतिरोधकांना लागूनच मोठे खड्डे पडले असून, विशेषतः तेलीपाडा येथील एका गतिरोधकाच्या बाजूला पाइपलाइन टाकताना खोदलेला मोठे चर कंत्राटदाराने तसेच ठेवून दिले आहेत. हे खड्डे आणि चर चुकवण्याच्या नादात समोरून येणाऱ्या वाहनांशी थेट धडक होऊन मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अवघ्या चार दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असून, त्यापूर्वी रस्ता दुरुस्त न झाल्यास येथे गंभीर दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

    उरण तालुक्यातील तेलीपाडा येथील एका गतिरोधकाच्या बाजूने उकरलेला रस्ता आणि तो चर योग्य रीतीने न बुजवल्यामुळे तो तशाच धोकादायक स्थितीत राहिला आहे, तर मुख्य रस्त्यावरील इतर गतिरोधकांच्या बाजूला मोठमोठाले खड्डे पडले आहेत. वेग मर्यादित करण्यासाठी असलेल्या गतिरोधकांवरच गाड्या आदळत असल्याने आणि ते वाचवताना अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे.

     उरण रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजू अजूनही प्रवाशांसाठी पूर्ण क्षमतेने खुल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे तेलीपाडा, करंजा, चाणजे आणि  नवीन शेवा परिसरातील शेकडो प्रवाशांना लोकल ट्रेन पकडण्यासाठी उरण बाजारपेठेतून जाण्याऐवजी द्रोणागिरी स्टेशन गाठावे लागते. द्रोणागिरी स्टेशनवर यायचे असल्याने नागरिक याच उरण पनवेल मुख्य रस्त्याचा मार्ग निवडतात. सकाळी आणि संध्याकाळी ट्रेन पकडण्याच्या घाईत असणारे नोकरदार आणि वाहन चालक या मुख्य रस्त्यावरील खोदलेल्या चरांमुळे आणि खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. 
     येत्या चार दिवसात पाऊस पडल्यानंतर या खोल चरांमध्ये आणि खड्ड्यांमध्ये पाणी साठणार आहे अशावेळी  मुख्य रस्त्यावर वाहन चालकांना खोलीचा अंदाज येणार नाही त्यामुळे गाड्या घसरून गंभीर अपघात होऊ शकतात. पाऊस पडण्यापूर्वी वाहन चालकांची या त्रासातून सुटका करावी आणि रस्ता प्रभावी बनवून द्यावा अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे

No comments:

Post a Comment

उरण येथे महिला काँग्रेसतर्फे महागाई विरोधात आंदोलन !!

उरण येथे महिला काँग्रेसतर्फे महागाई विरोधात आंदोलन !!  उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) :: केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅ...