'राष्ट्रभूमी भरारी'चा पहिला अंक प्रकाशित; निर्भीड पत्रकारितेच्या नव्या पर्वाची सुरुवात !!
*डोंबिवली, महेंद्र (अण्णा) पंडित, दि. १२/०६/२०२६
समाजातील वंचित, शोषित व सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा संकल्प बाळगणाऱ्या मराठी साप्ताहिक 'राष्ट्रभूमी भरारी'च्या पहिल्या अंकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी डोंबिवलीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली.
*मान्यवरांची उपस्थिती*
प्रमुख पाहुणे म्हणून डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक लेखाधिकारी अरुण साळुंखे, श्रमिक पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक महेंद्र उर्फ अण्णा पंडीत, सुप्रसिद्ध गायक सुतार, वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा प्रवक्ते सोनू पवार, 'दैनिक बातमीदार'चे विभागीय संपादक सचिन बुटाला, 'दैनिक महासागर'चे ठाणे आवृत्तीचे सहसंपादक अरुण ठोंबरे व गौतम वाघ, पत्रकार सुनील पगारे व अॅड. रजनी आगळे उपस्थित होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष विशाल पावशे, युवा नेत्या अश्विनीताई धुमाळ व सुरेखाताई जाधव, रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा निमंत्रक आनंद नवसागरे, आंबेडकरवादी जनहित संघटनेचे संदीप गजघट यांचीही विशेष उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
*निर्भीड पत्रकारितेचा गौरव*
प्रकाशनानंतर उपस्थित मान्यवरांनी साप्ताहिकाचे संस्थापक संपादक गौतम नामदेव गवई यांच्या निर्भीड पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी व जनहितासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याचा गौरव केला. सत्यनिष्ठ पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करणारी असून, 'राष्ट्रभूमी भरारी' हे साप्ताहिक समाजातील दुर्लक्षित प्रश्नांना न्याय देणारे प्रभावी व्यासपीठ ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
*कार्यक्रमाचे नियोजन*
कार्यक्रमाचे नियोजन रोहन माने, राहुल जाधव, वैभव वानखेडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने केले. समारोपप्रसंगी संपादक गौतम गवई यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचे आभार मानले. 'राष्ट्रभूमी भरारी' समाजहिताच्या भूमिकेतून निडरपणे कार्यरत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
साप्ताहिकाच्या पहिल्या अंकाच्या प्रकाशनाने सामाजिक, राजकीय व जनहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे भाष्य करणाऱ्या नव्या माध्यमाचा शुभारंभ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment