📢 बांधकाम कामगारांच्या नोंदणी व योजनांच्या लाभांसाठी कोणतेही शुल्क नाही; दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन !!
📍 नागपूर, दि. २ जून : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरणासह त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभ देण्यात येतात. या सर्व सेवा पूर्णपणे निःशुल्क असून कामगारांनी कोणत्याही एजंट, दलाल, मध्यस्थ किंवा संघटनेमार्फत कामे करू नयेत, असे आवाहन कामगार विभागाने केले आहे.
📝 कामगार विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, नोंदणी, नूतनीकरण व लाभासाठीचे अर्ज संगणक प्रणालीवर सादर केल्यानंतर कर्मचाऱ्यांमार्फत व नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत त्यावर कार्यवाही करून अर्ज निकाली काढले जातात. अर्ज मंजूर अथवा नामंजूर झाल्याची माहिती संबंधित कामगारास एसएमएसद्वारे कळविण्यात येते. बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतो. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. 💳
💻 सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने त्यासाठी कोणत्याही एजंट, दलाल, मध्यस्थ किंवा संघटनेची आवश्यकता नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. ऑनलाइन कामांसाठी कोणी पैसे, कमिशन किंवा लाचेची मागणी केल्यास संबंधित व्यक्तीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निःशुल्क क्रमांक १०६४ अथवा दूरध्वनी क्रमांकावर तसेच 📧
[acbwebmail@mahapolice.gov.in]
(mailto:acbwebmail@mahapolice.gov.in)
यावर तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भातील सूचना मंडळाच्या प्रत्येक जिल्हा कामगार सुविधा केंद्र आणि तालुका कामगार सुविधा केंद्र येथे लावण्यात आल्या आहेत.
👷 बांधकाम कामगार म्हणून नोंदणीसाठी पात्र असलेल्या कामगारांनीच नोंदणी करावी. तसेच नियोक्ता किंवा ठेकेदारांनी संबंधित कामगार त्यांच्या येथे कार्यरत असल्याचे आणि त्यांनी ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र द्यावे. याशिवाय ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अथवा महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनी पात्र बांधकाम कामगारांना ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र निर्गमित करावे, असे आवाहन कामगार विभागाने केले आहे.
No comments:
Post a Comment