१५ ऑगस्टच्या मुहूर्तावर सकाळीच बत्ती गुल आणि झाड कोसळले; एमआयडीसीत झाडे कोसळण्याची मालिका सुरूच !!
*डोंबिवली, दि. 15 ऑगस्ट 2026*
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळीच डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर काही वेळातच एक मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. सुदैवाने यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
*सकाळीच वीज गेली, झाडही पडले*
आज सकाळी 6 ते 6.15 च्या सुमारास पोलवर तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा बंद झाला होता. महावितरण कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करून सव्वा तासानंतर म्हणजे सुमारे 7.30 वाजता वीज पुन्हा सुरू केली. स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
वीज सुरू झाल्यानंतर सकाळी 7.30 वाजता निवासी मधील चिंतामणी सोसायटी RH 47 समोर एक मोठे गुलमोहराचे झाड रस्त्यावर कोसळले. त्यावेळी तेथे कोणतीही व्यक्ती किंवा वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून झाड तोडून ते रस्त्याच्या कडेला बाजूला केले.
*पावसाळ्यात 17 झाडे कोसळली*
एमआयडीसी निवासी परिसरात या पावसाळ्यात झाडे कोसळण्याची मालिका सुरू आहे. आतापर्यंत अंदाजे 17 झाडे पडल्याची नोंद आहे. बहुतांश झाडे गुलमोहराची असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
*केडीएमसीकडून समिती*
या प्रकारांची दखल घेत केडीएमसीच्या उद्यान विभागाने तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली आहे. ही समिती झाडे कोसळण्याच्या कारणांचा अभ्यास करून अहवाल केडीएमसी आयुक्तांना सादर करणार आहे.
*नागरिकांची मागणी*
स्थानिक नागरिकांनी केडीएमसी आणि एमआयडीसी प्रशासनाला तातडीने परिसरातील गुलमोहर आणि इतर धोकादायक झाडांची तपासणी करावी अशी मागणी केली आहे. जी झाडे अतिधोकादायक आहेत ती वेळीच तोडून घ्यावीत जेणेकरून भविष्यात कोणतीही दुर्घटना किंवा जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होणार नाही.
वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)
No comments:
Post a Comment