उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महानगरपालिकांना आदेश : खड्डेमुक्त गणेशोत्सवासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरा !!
*मुंबई, प्रतिनिधी* : येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शहरांमधील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व महानगरपालिकांनी तातडीने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
*आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा*
आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवातील रस्त्यांच्या प्रश्नांबाबत विशेष बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे दृकश्राव्य माध्यमातून सहभागी झाले होते.
यावेळी त्यांनी पावसाळ्यात तातडीने रस्ते बुजविण्यासाठी प्री-कास्ट आणि जिओ पॉलिमर टेक्नो पॅच यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शहरातील अंतर्गत रस्ते आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असेही निर्देश दिले.
*उच्च न्यायालयानेही घेतली दखल*
राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमधून रस्त्यावरील खड्ड्यांबाबत तक्रारी येत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या खड्ड्यांची माननीय उच्च न्यायालयानेही दखल घेऊन ते तातडीने बुजवण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत.
*बैठकीला कोण उपस्थित होते?*
या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डी. गोविंदराज, मुंबई मनपा आयुक्त अश्विनी भिडे, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे यांच्यासह एमएमआर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, वसई-विरार, भिवंडी, पनवेल आणि पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सांगली-मिरज-कुपवाड, लातूर, नांदेड, अहिल्यानगर, अकोला, इचलकरंजी, सोलापूर यासह इतर प्रमुख महानगरपालिकांचे आयुक्त उपस्थित होते.
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने तातडीने खड्डेमुक्त करावेत, असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व मनपा आयुक्तांना दिले आहेत.
No comments:
Post a Comment