मुंबई–नाशिक महामार्गावर पडघा येथे मद्यधुंद कंटेनर चालकाचा धुमाकूळ; दुचाकीला धडक, तिघे जखमी !
भिवंडी प्रतिनिधी (मिलिंद जाधव)
मुंबई–नाशिक महामार्गावरील पडघा येथील एम.ई.सीबी पॉवर हाऊस गेटसमोर मद्यधुंद अवस्थेत कंटेनर चालवणाऱ्या चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघांसह कंटेनर चालक जखमी झाला असून, तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघाताच्या गुन्ह्याची नोंद पडघा पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंटेनर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात होता. पडघा परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाले. कंटेनर उत्तर प्रदेश राज्यातील असून, चालकाचे नाव अमित पाठक असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यात आली. दरम्यान, मुंबई -नाशिक महामार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बसविण्यात आलेल्या ब्रेकरमुळे वाहनांचा वेग कमी झाला होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. महामार्गावर अवजड वाहने चालवताना चालकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये, तसेच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. विशेषतः दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा अधिक तपास पडघा पोलीस करीत आहेत.
No comments:
Post a Comment